चिपळूण आणि रत्नागिरीला पावसाने झोडपलं; राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज, चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल
राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये तुलनेने पावसाचा तडाखा अधिक बसेल असा देखील इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
गेल्या १६ तासांपासून चिपळूणला पावसानं झोडपलं आहे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या १६ तासांपासून चिपळूणला पावसानं झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी भरलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर चिपळूण शहरातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळूण नगरपालिका आणि प्रशासनाने नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. त्याचसोबत, आपत्ती व्यवस्थापन समिती देखील सज्ज झाली आहे.दरम्यान एनडीआरएफची टीम आपल्या पथकासह चिपळूणमध्ये दाखल झाली आहे
पुढील २४ तास देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com