खेड शहरात मोकाट जनावरांसह गाढवांचा मुक्त संचार सुरू असतानाच त्यात आता मोकाट श्वानांची भर
खेड शहरात मोकाट जनावरांसह गाढवांचा मुक्त संचार सुरू असतानाच त्यात आता मोकाट श्वानांची भर पडल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. शहरात भररस्त्यात मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असल्याने नागरिकांना
जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या श्वानांच्या बंदोबस्तासाठी नगरपरिषद प्रशासन काहीच उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात मोकाट जनावरांच्या वावरामुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. भटक्या गाढवांचाही मुक्त वावर सुरू आहे. यापाठोपाठ श्वानांचाही दहशत वाढल्याने नागरिकांच्या मनस्तापात आणखी भर पडली आहे. भररस्त्यातून श्वानांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने मार्गस्थ व्हायचे कसे? असा यक्षप्रश्न साऱ्यांनाच सतावत आहे. मंदिरासभोवतालच्या परिसरातही श्वानांचा वावर कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील काही भागांमध्ये श्वानांकडून हल्ल्याचे प्रकार देखील घडत आहेत. याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी दाखल करून देखील कुठलीच ठोस कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांची डोकेदुःखी कायमच आहे. दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मोकाट श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बिजीकरणाची मोहीम राबवली होती. सद्यस्थितीत वाढत्या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा एकदा निर्बिजीकरणाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com