
माखजन ग्रा.पं.कडून प्लॅस्टीक विरोधात मोहीम
संगमेश्वर ः दर शनिवारच्या आठवडा बाजारात प्लॅस्टीक पिशव्यांचा खुलेआम वापर करणारे व्यापारी, विक्रेत्यांवर माखजन ग्रामपंचायतीच्यावतीने दंडात्मक कारवाईला सुरूवात झाली आहे.
केंद्र व राज्य शासनाने पर्यावरण रक्षणासाठी थर्माकोल, प्लॅस्टीक पिशव्यांसह अन्य वस्तूंच्या वापरावर बंदी घातली आहे. तरीही दर शनिवारी भरणार्या माखजन येथील आठवडा बाजारात व्यापार्यांकडून प्लॅस्टीक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे.
ग्राहकांची संख्या कमी होवू नये यासाठी व्यापारी, विक्रेत्यांनी प्लॅस्टीक पिशव्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आवश्यक असलेले सर्व साहित्य प्लॅस्टीकच्या पिशव्यांमधून दिले जात आहे. यापूर्वी माखजन ग्रामपंचायतीच्यावतीने व्यापारी, विक्रेत्यांना प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर बंद करण्यासंदर्भात समज देण्यात देण्यात आली होती. तरीही प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवल्याने व्यापारी, विक्रेत्यांवर माखजन ग्रामपंचायतीच्यावतीने दंडात्मक कारवाईला सुरूवात झाली आहे.




