फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर व आजूबाजूची गांवे यामध्ये पुराचे पाणी आल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. सदर महापुरामुळे बहुसंख्य लोक बाधित झाले असून त्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावर व खाजगी संस्थांमार्फत मदतीचा ओघ सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजावर ओढवलेल्या संकटामध्ये मदतीचा हात पुढे करत दिनांक 29 जुलै रोजी चिपळूण व आजुबाजूची गांवे खेर्डी, उक्ताड, भुरणेवाडी, सती समर्थनगर इ. विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांसाठी मदतीचे वाटप केले. त्यामध्ये सहा हजार पाण्याच्या बाटल्या, 1200 ड्राय स्नॅक्स पाकीटे व 800 सोलापूरी चादर यांचा समावेश आहे.
चिपळूणचे आमदार मा. शेखर निकम व नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाटप करण्यात आले. मा. आमदार शेखर निकम ,नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, गावकरी, पदाधिकारी यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याबद्दल फिनोलेक्स व मुकूल माधव फाऊंडेशन यांचे आभार मानले.