माजी खासदार निलेश राणे चिपळूणमध्ये दाखल ,मदतीचे साहित्य सुपूर्त; एसपी; सीईओ यांच्याकडून पुराचा आढावा घेतला
मुसळधार पाऊस, कोसळणाऱ्या दरडी, बंद झालेले विविध मार्ग, संपर्कात येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा सामना करत केवळ चिपळूणवासीयांना मदत पोहोचविण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे शुक्रवारी मुंबईहून चिपळूण येथे दाखल झाले. सोबत आणलेली मदत त्यांनी संबंधितांकडे सुपूर्त केली तर एसपी आणि सीईओ यांच्याकडून परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला.
गुरुवारी चिपळूण शहर आणि परिसरात महापूर आल्याने हजारो माणसे विविध ठिकाणी अडकून राहिली होती. चिपळूनवासीयांनी २४ तासांपेक्षाही अधिक काळ अन्न पाण्याविना मदतीची वाट पाहत पाण्यात काढली. ही परिस्थिती विविध माध्यमातून भाजपा प्रदेश निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचत होती. अशावेळी चिपळूणवासीयांना आता मदतीची गरज आहे केवळ याच भावनेतून निलेश राणे शुक्रवारी सकाळी लवकर मुंबईतून चिपळूणला निघाले. त्यांनी आपल्या सोबत आवश्यक ते मदत साहित्य घेतले.
चिपळूणला येणाऱ्या जवळपास सर्वच मार्गांवर अनेक अडचणी होत्या. काही ठिकाणी दरडी कोसळत होत्या, काही ठिकाणी पाणी भरले होते. रस्ते बंद होते. संपर्क तुटला होता. परंतु याही परिस्थितीचा सामना करत निलेश राणे शुक्रवारी चिपळूण येथे पोहोचले.
त्यांनी चिपळूणच्या नागरिकांसाठी आणलेल्या जीवनावश्यक वस्तू पाणी, बिस्किटे, चिवडा, फरसाण, चटई, ब्लॅंकेट अशा वस्तू संबंधितांकडे वाटपासाठी सुपूर्त केल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडून त्यांनी चिपळूण पुराची आणि वस्तुस्थिती जाणून घेतली.
चिपळूण खेर्डी येथील सती समर्थनगर येथील सुमारे ८० ते ९० पूरग्रस्त कुटुंबांना राणे यांनी चटई, ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली.
www.konkantoday.com