
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती. तातडीने मदतीसाठी माजी आमदार बाळ माने यांनी साधला देवेंद्र फडणवीस, मंत्री राणे यांच्याशी संपर्क
रत्नागिरी : आषाढी एकादशीला आपण व्हिडिओच्या माध्यमातून हवामान खात्याच्या अंदाजवरून शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले होते. आता तर अतिवृष्टीचा कहर सुरू असून या आपत्तीच्या काळात एन.डी आर. एफ. आणि राज्य तसेच केंद्राची जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संपर्क केला आहे व तातडीने मदतीची मागणी केली आहे, अशी माहिती माजी आमदार बाळ माने यांनी प्रसार माध्यमांना दिली.
जिल्ह्यात अंदाजापेक्षा ही प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत आहे. खेड, चिपळूणमध्ये पुराची स्थिती आहे. प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांचे जीवित पुरामुळे धोक्यात आहे. त्यामुळे आता शेती वाचविण्याचे आव्हान समोर आहेच. सर्वात महत्त्वाचे पुरात अडकलेल्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम तातडीने करावे लागणार आहे.त्यामुळे आपण विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी तातडीने मदत करण्याची ग्वाही दिल्याचे माने यांनी सांगितले. पावसाचा धोका अजूनही टळलेला नाही. पुढील चार दिवसातही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी.
आषाढी एकादशीला बाळ माने यांनी संभाव्य अतिवृष्टीच्या धोक्यापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी बळीराजाने अतिवृष्टीचे पाणी शेतात साचून पिकाचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा कहर सुरू असून नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. अनेक गावात पुराचे पाणी भरले आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आणि समाजसेवी संस्थांनी संकटग्रस्त लोकांना मदत करण्याचे आवाहनही माने यांनी केले आहे. या काळात काही तातडीची मदत लागल्यास मला ९५४५१९५३३३ या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन माने यानं केले आहे.
www.konkantoday.com