कोरोना महामारीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीला रत्नागिरीतील जाणीव फाउंडेशन

कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांवर आघात झाला. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगारही गेले. घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे या कुटुंबाचा चरितार्थ चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेक कुटुंब उदध्वस्त झाली आहेत. परंतु या कुटुंबांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रत्नागिरीतील जाणीव फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने अनोखा उपक्रम आखला आहे. याकरिता सर्वेक्षण करण्यात येत असून पुढील महिन्याभरात पुढील पावले उचलण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही कुटुंब उद्ध्वस्त झाली. घरातील कर्ता पुरुष किंवा कमावता एकुलता एक व्यक्ती कोरोनामुळे निधन पावल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले. या सकंटातून सावरण्यासाठी या कुटुंबांना शेजारी, नातेवाईक मदत करत आहेत. परंतु कर्ता पुरुष जेवढे उत्पन्न मिळवत होता तेव्हढे उत्पन्न मिळवणे कठीण असल्याने या कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता मदत करण्याचा प्रयत्न मा. सुरेश प्रभू सर यांचे मार्गदर्शनाखाली जाणीव फाउंडेशन करणार आहे.
यासंदर्भात जाणीव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते महेश गर्दे म्हणाले की, कोरोनाचा परिणाम समाजात सर्व थरांत जाणवतो आहे. आम्ही गेले वर्षभर वेगवेगळ्या माध्यमांतून मदत करत आहोत. परंतु ज्या घरात कमावता व्यक्ती गेला आहे, त्या कुटुंबात कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने किंवा त्या कुटुंबाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, आम्ही पावले उचलत आहोत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री, कोकणचे सुपुत्र खासदार सुरेश प्रभू व सौ. उमा प्रभू यांच्या परिवर्तन संस्थेचीही मदत मिळणार आहे.
याकरिता जिल्ह्यातील माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने गावचे सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका आणि ग्राम कृती दलाच्या सदस्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीव फाउंडेशनकडे कर्ता व्यक्ती गमावलेल्या व मदतीची गरज असणाऱ्या कुटुंबांची माहिती द्यावी. त्यानुसार जाणीव फाऊंडेशन पाठपुरावा करणार आहे. या कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देताना त्या व्यक्तीची आवड, निवड व गरज पाहून व्यावसायिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
खासदार श्री. प्रभु माध्यमातून सध्या जिल्ह्यात १००० शिलाई मशीन तसेच विद्यार्थ्यांना १००० सायकलचे मोफत वाटप सुरू आहे. त्याचबरोबर महिलांना तसेच तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button