आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ आहेत, हे पद काँग्रेसकडेच राहणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
राज्यातील विधानसभा अध्यक्षपदावरूनही महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहे. तालिका अध्यक्ष असलेले भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षपद मिळण्याबाबत उत्सुक असल्याचे दिसत आहेत. तर, दुसरीकडे वनमंत्री संजय राठोड यांचे रिक्त झालेले पद काँग्रेसला द्यावे आणि त्या बदलत्यात विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेने घ्यावे, अशीही पक्षातून मागणी होत आहे. यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत आमच्याकडेही अनेक ‘ भास्कर जाधव’ असून, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केलीतालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतूकच आहे. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार नाही. आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ आहेत, हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षातही असे सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आले आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार झालेला नाही, असे नमूद करत अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया असल्याने आणि कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये, यासाठी वातावरण निवळल्यावरच ही निवडणूक घ्यावी लागेल, असेही थोरात म्हणाले.
www.konkantoday.com