कोमसाप संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांच्या वाढदिवसानिमित्त कवी केशवसुत स्मारकाच्या वतीने चाफ्याच्या झाडांची लागवड
मालगुंड : मराठी भाषा आणि मराठी साहित्याची चळवळ वृंद्धीगत व्हावी यासाठी अग्रेसर असणारी संस्था म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद. या साहित्य परिषदेच्या स्थापना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केली. त्यानंतर कोकणातील अनेकांना या साहित्य चळवळीत संधी मिळाली. यामागे नक्कीच कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख मधु मंगेश कर्णिक यांची प्रेरणा आहे. यावर्षी आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांना वयाची नव्वदी पूर्ण करत आहेत. आदरणीय मधुभाई यांनी आपल्या साहित्यात नेहमीच कमी पावसात सर्वत्रच होणाऱ्या आणि सुगंधी गुणाने परिसर सुवासक करणाऱ्या पांढऱ्या चाफ्याचा उल्लेख केला आहे. आदरणीय मधुभाई यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय समन्वयक अ. वि. जंगम यांनी सर्वत्रच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्वच शाखामधून देवचाफा किंवा सोनचाफा लावून खऱ्या अर्थाने आदरणीय मधुभाई यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्ह्यातील कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या वतीनेही मोठया प्रमाणात देवचाफ्याची आणि सोनचाफ्याची झाडे लावण्याच्या संकल्प करत, या उपक्रमाची सुरुवात नुकतीच कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय समिती, मालगुंडचे कोषाध्यक्ष रविंद्र मेहेंदळे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती मालगुंडचे अध्यक्ष अमेय धोपटकर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडचे सदस्य रामानंद लिमये, कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रुती केळकर, कुमार डांगे, स्वप्नेश राजवाडकर उपस्थित होते.
यापुढेही विविध ठिकाणी सोनचाफा आणि देवचाफा यांची रोपे सर्वत्र लावण्यात येणार असल्याची माहिती कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष तथा पंचायत समिती रत्नागिरीचे सदस्य गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी दिली आहे.