विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा:सुरेश प्रभू
कोकणचा शाश्वत विकास‘ या परिसंवादाला चांगला प्रतिसाद
‘कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजे’,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
कै.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘कोकणचा शाश्वत विकास’ या दोन दिवसीय परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.परिसंवादातील पहिले सत्र शनिवार १९ जून आणि दुसरे सत्र रविवारी २० जून रोजी उत्साहात पार पडले.या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला.
पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत,’गद्रे मरिन्स ‘चे दीपक गद्रे,प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन,देसाई बंधू आंबेवाले उद्योगाचे संचालक जयंत देसाई,माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे,डॉ प्रकाश शिंगारे हे मान्यवर सहभागी झाले.दुसऱ्या दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठान चे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे,अभ्यासक डॉ दीपक आपटे,डॉ उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन,पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान चे मिहीर महाजन,दीपक महाजन यांनी संयोजन केले.ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले,’कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही,याकडे लक्ष दिले पाहिजे. काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पर्यटनातून काम मिळू शकते.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजे.व्यक्ती आणि गाव एकत्र असले पाहिजे.संवादाला कृती कार्यक्रमाची जोड देऊया.
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत म्हणाले,’नैसर्गिक संकटात कोकणी माणूस खचून गेला असला तरी कोकणचे अर्थकारण जपण्यासाठी शेती जपली पाहिजे आणि ती करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवले पाहिजे.कोकणची तुटीची शेती फायद्यात आणली पाहिजे.चाकरमान्या माणसांना गावाशी जोडून ठेवली पाहिजे. शाश्वत विकास होताना त्याचा वेग पेलणारा असला पाहिजे आणि लोकसहभाग असला पाहिजे.उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून पिके घेतली पाहिजे.क्रॉप पॅटर्न ठरवून भातशेतीमध्ये तीन पेक्षा जास्त पिके घेतली पाहिजेत.कोकणात यांत्रिक भाजीपाला शेती,बांबू,मश्रुम,जांभूळ,सुरंगी,नागकेशर,अननस,हळद,त्रिफळ लागवडीचे प्रयोग यशस्वी होतील.
जयंत देसाई म्हणाले,’साडे तीनशे किलोमीटर लांबीचा किनारा आणि तीन जिल्ह्यात असलेली वेगवेगळी पिके याचा उपयोग करून घेतला पाहिजे. शेती आणि पूरक उदयॊगांसाठी कमी व्याजाने कर्ज मिळाले पाहिजे.हापूस सारखे फळ हे भारतभर सफरचंदासारखे मिळाले पाहिजे.
विनय महाजन म्हणाले,’कोकणातील प्रत्येक गाव उर्जितावस्थेत आणले पाहिजे. विकास झाला पाहिजे पण विकास होणे म्हणजे शारीरिक श्रम कमी होणे नव्हे ,हे लक्षात ठेवले पाहिजे. गावातील तरुण गावातच राहावा,यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ‘
दीपक गद्रे म्हणाले,’कोकणातील मासेमारीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. माशांवरील प्रक्रिया उदयॊगात आणि शेवाळ शेतीत आपण उतरले पाहिजे.
डॉ प्रकाश शिंगारे म्हणाले,’मस्त्यशेतीतून समृद्धी शक्य असून गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन ,जलाशयातील मत्स्योत्पादन यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
संजय यादवराव म्हणाले,’कोकणसाठी पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे.कोकण पर्यटनाची लोक चळवळ झाली पाहिजे.फुकेत बेटाला १२ किनारे असूनही २५ हजार कोटीचे अर्थकारण होते,हे उदाहरण लक्षात ठेवले पाहिजे.पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मदत करणाऱ्या सरकारने कोकणातील पर्यटन
डॉ आपटे म्हणाले,’हवामान बदलाचे धोके वाढत जाणार आहेत.समुद्राची पातळी वाढत आहे.जमिनीचा ऱ्हास होणार आहे.कोकणच्या पर्यावरणाचा नाश होऊन चालणार नाही.मॅन्ग्रूव्ह तोडून ऍक्वाकल्चर करणे,वाळूचा उपसा ,खाणी अशा गोष्टी धोकादायक ठरतील.
डॉ उमेश मुंडले म्हणाले,’जलसंधारण आणि जलव्यवस्थापन कोकणात होणे आवश्यक आहे.जलसंधारणाचे प्रयोग गांभीर्याने होत नाहीत.जंगल तोडल्याने माती वाहून चेक डॅम भरून जातात. केटी वेअर च्या प्लेट जाग्यावर राहत नाहीत. जागा नीट न निवडल्याने बंधारे वाया जातात.समस्यांचे सुलभीकरण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
हनुमंत हेडे म्हणाले,’कोकणात कृषी पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था उभी राहू शकते.त्यासाठी शासकीय धोरण आखलेले आहे. उत्सव आयोजित करण्यापासून बीच शॅक धोरणापर्यंत गोष्टींचा त्यात समावेश आहे.
www.konkantoday.com