नाम ‘बाबू’ है मेरा सबकी खबर रखता हूँ ||

0
722

पानवाला भय्या नाही तर भाऊ-बाबू शिरधनकर-एका जगन्मित्राचे दु:खद निधन…

ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-९४२२०५२३३०

दोन दिवसांपूर्वीच बातमी कळली, पूनम पान शॉपचे मालक दिवाकर तथा बाबू शिरधनकर यांचे दु:खद निधन.
कोणाच्या लक्षात आले की नाही कोण जाणे हा आपला बाबूशेठ शिरधनकर गेला. विहारजवळील पानवाला. बाबूला कोणी ओळ्खत नसेल असा माणूस दुर्मिळच! कोरोना संकटाच्या काळामध्ये केव्हातरी बातमी येऊन जाते आणि मग कोणीतरी जवळचा मित्र अशी दु:खद बातमी देतो आणि खूप दु: होते. अरे आता या मित्राची आपली भेट आता कधीही नाही याची जाणीव झाली की दु: अधिक तीव्र होते, पण आपणही हतबल असतो, तसेच काहीसे माझे बाबूच्या निधनाची बातमी वाचून झाले. या कोरोनामुळे संकटकाळामध्ये काही गंभीर आजाराने बाबू खूप थकला होता याची पुसटशी कल्पनादेखील मला नव्हती. श्री देव भैरीबुवाच्या पालखीबरोबर पहाटे हमखास भेटून हाक मारणारा बाबू यावर्षी भेटला नव्हता तरीही काही शंका आली नव्हती. तरी मंडळी म्हणतच होती अहो बाबू यंदा कोठे आला नाही तो हाक मारायला. मनांत म्हटलं, असेल कुठेतरी पुढे गेला असेल गर्दीत. पण तरीही काही शंकाच आली नाही. आणि अचानक अशी त्याच्या निधनाची बातमी आली.

बाबू शिरधनकर, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी माझ्या सारख्या अनेकांचा जवळचा मित्र. शाळेत बरोबर होतो कुठेतरी. त्याच दरम्याने कधीतरी मुरुगवाड्यामध्ये संघाची शाखा घेण्याची जबाबदारी आली होती. शिरधनकर, मयेकर, भोंगले,बिर्जे, तोडणकर आदि मित्रमंडळींच्या जिवावर काही दिवस शाखा होत होती. त्यात बाबूची ओळख अधिकच झाली. पण त्यानंतर कॉलेज शिक्षण यामध्ये बाबूजवळ तसा संपर्क नव्हता. सणावाराला, घरगुती समारंभ प्रसंगी शिरधनकरांच्या गादीवरून मसाला पाने आणायची एवढाच काय तो पानपट्टीच्या गादीशी संबंध. बाबू त्याकाळी गादीवर फारसा ॲक्टीव्ह नव्हता.

व्यवसायासाठी रत्नागिरीमध्ये स्थिरावल्यानंतर रोजच बाबूच्या गादीवर जाण्याचा नेम सुरु झाला. बरेचदा रात्री जेवण झाल्यानंतर बाजारात मित्रमंडळींबरोबर बाजारात चक्कर मारायची, बाबूच्या गादीवर ५-१० मिनिटे थांबायचे, कोणाची पानाची खरेदी तर कोण नुसतीच बडीशेप हातावर घेऊन आपसात गप्पा मारणे आणि मग घरोघर परतणे असा तो नेम असायचा. पान-तंबाखू विषय संपल्यानंतरही आठवड्यातून एक दोन वेळा बाबूच्या गादीवर चक्कर होत असे. गप्पा मारायला रात्रौ जरा बाबू निवांत असायचा. नेहमीच्या गिऱ्हाईकांनी सांगितल्याबर हुकुम पान, मावा पुड्या अश्या ऑर्डर्स पूर्ण करायची बाबूची गडबड असली तरी गाठ मारून वर घेतलेल्या मल्टिकलर लुंगीच्या मधील आपले सिंगल फसली शरीर लयबध्दपणे हलवीत एकीकडे गप्पा मारत, दिवसभरातले रत्नागिरीमधील घटनांचे वार्तांकन करीत बाबू ऑर्डरचे काम पूर्ण करीत असे हे आम्ही रोजच पाहिले आहे. पान लावतांना बाबू अशी काही लयबध्द हालचाल करायचा की पहाणाऱ्याला गम्मत वाटावी. मला वाटायचे जर बाबूला बांधून ठेवले तर त्याला पानाला साधा चुनाही लावता येणार नाही. मेकॅनिक जसा निळा युनिफॉर्म घालतात तशी ती मल्टीकलर लुंगी आणि त्यावर बरेचदा पांढरे डगले पण विविध रंगानी नटलेले हा त्याचा युनिफॉर्म होता. कधीही चेहऱ्यावर त्रास नाही, श्रमाचे ओझे नाही सकाळी १० ते रात्रौ किमान १० पर्यंत बाबूचे शरीर आणि त्याबरोबर पान-मावा लावणारे दोन्ही हात अव्याहतपणे चालू असायचे. बरं त्यातही अनेकांच्या अनेक प्रकारच्या ऑर्डर्स, अर्थात जरी सर्वच पानवाले नियमित पान घेणाऱ्यांच्या ऑर्डर्स लक्षात ठेवणारे असले तरी बाबूची ती वेगळीच खासियत होती. तसं म्हटलत तर राम आळी, गोखले नाका परिसरातील व्यापारी बरेचदा दुकाने बंद झाल्यावर जेवण करून मग आपापली पाने-माव्याच्या पुड्या नेत असत. मी हे बरेचदा बघितले होते. माझे परगावचे नातेवाईक आले आहेत असे म्हटले तरी त्यांची नावे विचारून त्यांची ठरलेली पाने बरोबर लक्षात ठेवून बाबू देत असे, इतकेच नव्हे तर नातेवाईक परस्पर बाबूकडे गेले तरी बाबू “केव्हा आलात, किती दिवस मुक्क्काम वगैरे चौकशी” केल्याशिवाय रहात नसे हे विशेष. बहुतांशी विविध प्रकारच्या व्यक्ति, मित्रमंडळी हे बाबूजवळ मोकळेपणाने सुख-दु:खाच्या गोष्टीही बोलत असत हे मी पाहिले आहे. मला वाटतं त्यानिमित्ताने बाबू तसा वैचारिक श्रीमंत नक्कीच झाला होता हे त्याच्याशी गप्पा मारतांना जाणवत असे. म्हणजे काही वर्षापूर्वीपासून तो गुरुवारच्या सत्संग बैठकीला जातो हे त्याने सांगितल्यावर मला जरा आश्चर्यच वाटले नाही.

रत्नागिरीमधून परगावी गेलेला प्रत्येकजण सणावाराच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आला की हमखास बाबूच्या गादीला भेट देणारच. रात्री बाबूकडे गेल्यावर “अरे तो अमका आलाय, जयू भेटला काय–तुला हेमंत भेटला कारे, बंड्या आलाय गणपतीला पण लगेच परत जाणार आहे कारण रजा नाहीए—वगैरे वगैरे” अशा अनेक बातम्या बाबू बरोबर संबंधितांना अदबीने पोहोच करायचा. म्हणजे एकाद्या मित्राला भेटायचे असेल तर बाबूच्या गादीवर निरोप ठेवला की बस झाले, हमखास भेट होणारच. अशाप्रकारे बाबूला अनेक बातम्यांचा स्टॉक ठेवावाच लागत असे. पण हे सगळं तो केवळ मित्रप्रेमाने आवर्जून करायचा. मूर्ती लहान पण मित्रमंडळीचा गोतावळा मोठा पण बाबू कधी राजकारणाच्या फंदात पडला नाही, पण रत्नागिरीमधल्या कथित अव्वल राजकारण्यांना तो चांगलेच ओळखून होता हे त्याचेबरोबर झालेल्या संवादावरून मी अनेकदा अनुभवलाय. मुरुगवाडा म्हणजे बोली भाषेत “मुर्गातला” असल्याने बाबूच्या बोलण्यात टिपिकल भंडारी शिव्या नसल्यातरच नवल. खरं तर बाबू राजकारणात आला असता तर तो नगरसेवक नक्कीच झाला असता पण आपला तो पिंड नाही असे त्याचे स्पष्ट म्हणणे होते. पण तरीही “ xxच्यानो काय खायचे ते खा पण नागरिकांची कामे करा रे” एवढच तो रत्नागिरी शहराविषयीच्या राजकारणाबाबत बोलायचा.

बाबूला आल्या-गेल्याची सर्वांच्या मित्रमंडळींची, गावातील चांगल्या वाईट घटनांची खबर नेहमीच असायची. आणि त्याचा तो सत्कार्यासाठी उपयोग करायचा. म्हणूनच मला एका हिंदी गाण्याची आठवण होते “नाम अब्दुल है मेरा सबकी खबर रखता हू” या शान चित्रपटातील गाण्याची. मी फक्त अब्दुलच्या ऐवजी “बाबू” नाव शीर्षकात घातलय!

शेजारी सुखधाम, विहार वगैरे हॉटेल्स असल्याने बाबूच्या गादीवर दुपारी पान खाणारे गिऱ्हाईक जोरात असायचे. लॉजवर येणाऱ्या नवख्यांना रत्नागिरीत कोठे काय याची वित्तंबातमी बाबू पान लावता लावत खुबीने देत असे आणि तीही विनामूल्य. दुपारी काही काळ जेवायला गेला तर गिऱ्हाईक थांबणारच. लॉजवर येणारेही बाबूची आठवण नक्कीच काढतील यात शंकाच नाही.

मला बाबूचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे आहे. आजूबाजूच्या दुकानातील नोकरवर्गही बाबूकडे त्यांच्या त्यांच्या सुट्टीमध्ये विरंगुळा म्हणून जात असत. पण त्यातही गम्मत म्हणजे ते गप्पा मारता मारता बाबूची पाने लावून दे, कुठे चुना कालवून दे, कात तयार करून दे अशी बारीक सारीक मदत बाबूला करीत असत. जवळच रिक्शा स्टॉप होता. एकाद्याने रिक्शा नाकारली तर बाबू त्या गिऱ्हाईकाची नड आपणहून ओळखायचा आणि स्वत: गादीवरूनच रिक्शाचालकाला आवाज देऊन रिक्शा सेवा द्यायला लावायचा. रिक्शा चालकही त्याला प्रेमाने सहकार्य द्यायचे असेही प्रसंग मी स्वत: अनुभवले आहेत. थोडक्यात कोणाच्याही अडी-नडीला उपयोगी पडणारा रत्नागिरीमधील पानवाला भय्या नाही “भाऊ” म्हणून बाबूची ख्याती होती असे म्हटले तरी वावगे होणार नाही. बाबू जगन्मित्र होता हेही तितकेच सत्य. बाबूविषयीचे अनेकांचे अनुभव असेच असतील, त्यांनाही माझ्यासारखेच जवळचा मित्र गमावल्याचे नक्कीच जाणवत असेल याची मला खात्री आहे, मी केवळ भावना व्यक्त करू शकलो आहे ही माझी जमेची बाजू. बाबूच्या निधनाने माझ्या सारख्या अनेकांनी जवळचा मित्र गमावला आहे. एका सहृदयी, सदगृहस्थ आणि व्यवसायाबरोबरच सामाजिक भान ठेवणाऱ्या सर्वसामान्य परंतु जगन्मित्र झालेल्या बाबूला ईश्वर सदगती देईल यात मला तरी शंका नाही. पण त्याची आजारपणात कधीच भेट झाली नाही ही हुरहुर मनात कायमची राहीलच हेही तितकच खरं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here