मृतांची संख्या मर्यादेत आणण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन युद्धपातळीवर उपाय राबवून नागरिकांचे जीव वाचवा – ॲड. दीपक पटवर्धन
मृतांची आकडेवारी, त्याचा ताळमेळ हा विषय होत राहील. पण रत्नागिरीत रोज वाढणारी मृत्युसंख्या हा विषय गंभीर आहे. हे गांभीर्य ओळखून आरोग्य यंत्रणेने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला तात्काळ घ्यावा. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन स्थानिक डॉक्टरांना मिळावे यासाठी वेबिनार करावेत. ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करावे. होणारे मृत्यू हे खूप जास्त आहेत. ते मर्यादेत आणण्यासाठी सर्व संभव प्रयत्न करणे आवश्यक आहे. युद्ध पातळीवर याबाबत पावले उचलणे अभिप्रेत आहे. रुग्णांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी मोठ्या कोव्हीड सेंटर मध्ये काही योजना करणे, रुग्णाला मानसिक आधार देणे यासाठी योजनापूर्वक प्रयत्न करणे आवश्यक वाटते. हे समुपदेशन खूप महत्त्वाचे ठरेल. आरोग्य सुविधा अधिक वाढवणे आवश्यक ठरत आहे. रत्नागिरीतील कोव्हीड कालखंडात कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, संबंधित यंत्रणा या सर्वांचे योगदान कायम लक्षात राहील असे आहे. मात्र कामाचा सततचा ताण, तोच तोच पणा यामुळे सर्वच यंत्रणा क्षिणली आहे. अशा स्थितीत जर तज्ञ डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ अशांबरोबर वेबिनार आयोजित केले तर चांगला संवाद घडेल आणि त्यातून मार्गदर्शन मिळेल. तज्ञांच्या अनुभवाचा लाभ मिळेल. डिझास्टर मॅनेजमेंट समितीने मृत्यू संख्या वाढणार नाही यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करावी व मृत्यू संख्या मर्यादेत येईल असे पहावे अशी विनंती भा.ज.पा. अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com