कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तीनही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने ताब्यात घ्यावी-राणे

माजी खासदार निलेश राणे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्री .हर्षवर्धन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव संजीव कुमार यांना पत्र

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन नंतरही कोरोना रुग्ण कमी झालेले नाहीत. मृत्युदर देखील कायम आहे. अशा परिस्थितीत ढासळत असलेल्या आरोग्य व्यवस्थेला तीनही जिल्हाधिकारी जबाबदार ठरत आहेत. कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखणे स्थानिक प्रशासनाच्या हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे आता तीनही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने ताब्यात घ्यावी, असे पत्र माजी खासदार तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री श्री.हर्षवर्धन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव संजीव कुमार यांना पत्र दिले आहे.

निलेश राणे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील आणि विशेषकरून मुंबईला जोडल्या गेलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हीड-19 ची परिस्थिती फारच विदारक झाली आहे. कोव्हीड – 19ची आपत्ती हाताळताना स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अपयशी ठरताना दिसत आहेत. हे तीनही जिल्हे भौगोलिकदृष्ट्या लहान असले तरी या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होताना दिसत आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लावली गेली आहे. त्यानंतरही रुग्णसंख्या कमी झालेली नाही, हे स्पष्ट दिसून येते.
कोव्हीड19 सारख्या आपत्तीपासून असलेल्या संकटाला प्रतिबंध करणे, त्याचा धोका कमी करणे अथवा प्रभाव कमी करणे, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वाढवणे आणि त्याला तोंड देण्यासाठी सुसज्जता वाढवणे, आपत्तीच्या घटनांमध्ये योग्य तो शीघ्र प्रतिसाद देणे, आपत्तीचे गांभीर्य आणि परिणाम ओळखणे, आपत्तीच्या घटनांमध्ये बाधितांसाठी तातडीने मदत देणे, सततच्या व एकत्रित प्रक्रियेसाठी नियोजन व आयोजन करून आणि समन्वय साधत उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हे खऱ्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांची जबादारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात तीनही जिल्हाधिकारी अपयशी ठरले आहेत. असे निलेश राणे यांनीं म्हटले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button