“ब्रेक द चेन” 3 ते 10 जून या कालावधी दरम्यानजिल्ह्यात वाढीव कडक निर्बंध व अंमलबजावणी
रत्नागिरी दि. ०१ : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदीनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले आहेत, व त्यास अनुसरुन राज्य शासनाने निबंध जारी केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. सदरचे प्रतिबंध लागू करुनही रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोव्हीड-19 रुग्णांच्या पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 20% असून 67% च्या वरती ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्यातील सदयपरीस्थिती विचारात घेता, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने या कार्यालयाकडील संदर्भ क्र.७ अन्वये आदेश पारीत करण्यात आला होता. त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने, दिनांक 02 जून, 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजले पासून ते दिनांक 09 जून, 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सुधारीत आदेश निर्गमित करण्यात येत आहेत..
- मेडीकल टुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. तथापि, सदर आस्थापना मधून खादयपदार्थ, किराणा माल, वैदयकीय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. याव्यतिरिक्त किराणा मालाच्या दुकानासह सर्व प्रकारचे दुकाने /आस्थापना पुर्णत: बंद राहतील.केवळ दुध विक्री घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत करता येईल.
- रत्नागिरी जिल्हयाच्या सिमा अन्य जिल्हयातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्हयात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत. तथापि, केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी, वैदयकिय उपचारासाठी, व
कोव्हीड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या/ आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील.
जिल्हयात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र / पोलीस विभागाकडील ई-पास सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
- सर्व प्रकारची शासकीय व खाजगी सार्वजनिक वाहतुक बंद राहील. केवळ आपत्कालिन परिस्थितीत त्यांना प्रवासी वाहतुक करता येईल.
- सर्व प्रकारच्या बँका / वित्तीय संस्थांचे कामकाज बंद राहील. तथापि, केवळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पिक कर्ज व त्या अनुषंगिक बाबींच्या कामकाजासाठी 10% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत बँका / वित्तीय संस्था सुरु राहतील.
- सर्व प्रकारचे अत्यावश्यक नसणारे उदयोग व त्यांच्या आस्थापना बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तुंची निर्मिती /उत्पादन/ पुरवठा करणारे उदयोग /आस्थापना सुरु राहतील. त्यांचे कामगारांचे वाहतुकीची व्यवस्था संबंधित कंपनीने करणे आवश्यक राहील.
- सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
- सर्व पेट्रोल पंप हे केवळ अत्यावश्यक वाहतुकीसाठी सकाळी 07.00 ते सायंकाळी 05.00 या कालावधीत सुरु राहतील. तथापि, मालवाहतुकीच्या वाहनांना पेट्रोल भरण्यासाठी वेळेचे बधंन राहणार नाही.
- मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि, अशी मालवाहतुक केवळ दुकानापर्यंत / आस्थापनेपर्यंत माल वितरण करणेपुरती मर्यादित राहील. कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरविता येणार नाही. याबाबत शर्तभंग आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करणेत येईल.
- शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषि विषयक संलग्न बियाणे, खते, किटकनाशके, शेतीची अवजारे,व त्यांच्या दुरुस्ती संबंधिची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा राहील.
- अत्यावश्यक व आपत्कालीन शासकीय यंत्रणा तसेच अन्य शासकीय कार्यालये एकुण कर्मचारी संख्येच्या 15% एवढया कर्मचारी संख्येसह सुरु राहतील.
- शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
- सदर आदेशात नमुद नसलेल्या बाबी त्यांना जोपर्यंत विशेष आदेशान्वये सुट दिली जात नाही तोपर्यंत बंद समजण्यात याव्यात. यापुर्वीच्या सर्व आदेशान्वये निर्गमित केलेले सर्व निर्बंध दंडाच्या तरतुदीसह लागू राहतील. सदरचा आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 02 जून, 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजले पासून ते दिनांक 09 जून, 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.
०००