
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ४६ पैकी २६ रुग्णवाहिका लवकरच मिळणार-जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ४६ पैकी २६ रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित २० रुग्णवाहिकांची मागणीही करणार आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ६७ पैकी ४६ रुग्णवाहिका जुन्या झाल्या आहेत. पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्याचवेळी जास्तीत जास्त रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला मिळाव्यात, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी ९ रुग्णवाहिकांना मंजुरी दिली असून, त्या येत्या आठवडाभरात जिल्ह्याला मिळणार आहेत.त्याचबरोबर शासनाकडून ७ रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे एकूण १६ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम परत गेली असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी लक्षात आणून दिली. त्या रकमेतून जिल्ह्याला १५ रुग्णवाहिका मिळाव्यात या मागणीचा प्रस्ताव वित्त आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला आणखी १० रुग्णवाहिका मिळणार आहेत. अशा एकूण २६ रुग्णवाहिका जिल्ह्याला येणार असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूर हे उपस्थित होते.
www.konkantoday.com