मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता

खेड : पाऊस तोंडावर आला तरी कशेडी-पशुराम घाटादरम्यानच्या महामार्गाचे काम पुर्ण करण्यात ठेकेदार कंपनी अपयशी ठरली असल्याने या वर्षीच्या पावसाळ्यातही वाहन चालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मे २०२० पर्यंत खेड तालुक्याच्या हद्दीतील महामार्गाच्या किमान एका बाजूचे क्रांकिटीकरण पुर्ण होईल असे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले होते मात्र मे २०२१ संपत आला तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुर्ण झालेले नसल्याने ठेकेदार कंपनीने दिलेले आश्वासन राजकीय आश्वासनांप्रमाणेच हवेत विरले गेले आहे.
कशेडी घाटाचा पायथा ते पशुराम घाट हा ४४ किलोमिटरचा महामार्ग खेड तालुक्याच्या हद्दीत येतो. हा मार्ग अवघड घाट आणि वेड्या- वाकड्या वळणाचा बनलेला आहे. त्यामुळे या घाटरस्त्याचे क्रांकिटीकरण वेळेत पुर्ण व्हायला हवे होते. कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर ही ठेकेदार कंपनीकडे या मार्गाचा ठेका आहे. चार वर्षाहून अधिक काळ ही कंपनी चौपदरीकरणाचे काम करत आहेत. २०२० च्या मे महिन्यात या ४४ किलोमिटर रस्त्याच्या एका बाजुचे क्रांकिटीकरण पुर्ण होईल असे आश्वासन ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापनाकडून वारंवार दिले गेले होते. मात्र मे २०२१ संपत आला तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुर्ण झालेले नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत.
दोन वर्षांपुर्वी ठेकेदार कंपनीने या दरम्यानचा अवघड भोस्ते घाट फोडायला सुरवात केली होती. सुरवातीला कामामध्ये चांगली गती होती. मात्र पुढे पुढे कामाची गती मंदावल्यामुळे दोन वर्षे उलटूनही चार किलोमिटरच्या भोस्ते घाटाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही.चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने तयार केलेल्या पर्यायी मार्गाचे डांबरीकरण करायचे आहे. रस्त्याचे टेंडर घेताना कंपनीने तसे मान्य देखील केले आहे. मात्र या ठेकेदार कंपनीने केवळ पैसे वाचविण्यासाठी एकाही पर्यायी मार्गाचे डांबरीकरण न केल्याने पर्यायी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होणे, वाहने नादुरुस्त होते असे प्रकार घडत आहेत.
खेड रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचे काम करताना बाजूच्या मोकळ्या जागेतून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. हा मार्ग सुमारे दोन किलोमिटरचा आहे. या मार्गावर वाहनांची सततची वर्दळ असल्याने या पर्यायी मार्गाचे तरी किमान डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र इथेही ठेकेदार कंपनीनी पर्यायी मार्गाचे डांबरीकरण न केल्याने वाहन चालक आणि प्रवाशी गेले तीन महिने आदळत-आटपत प्रवास करत आहेत.
भोस्ते घाटातही काही भागाचे क्रांकिटीकरण रखडले आहे. गतवर्षी या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांना अपघात झाले होते. दुचाकी, रिक्षा यासारखी वाहने नादुरुस्त झाली होती. या वर्षी या ठिकाणी एका बाजूचे क्रांक्रिटीकरण पुर्ण झाले आहे. मात्र दुसरी बाजू अद्याप पुर्ण झाली नसल्याने या वर्षीही पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौपदरीकरणादरम्यान भरणे नाका, दाभीळ, लोटे या ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरु आहे. ओव्हरब्रिजचे काम रखडले असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे. भरणे नाका येथील ओव्हर ब्रिज वगळता ठेकेदार कंपनीने अन्य ठिकाणी पर्यायी मार्गांचे डांबरीकरण केलेले नाही साहजिकच या ठिकाणीही पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button