
तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु
केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे
मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत आज 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे.
www.konkantoday.com