नारकरबाईंना भावपूर्ण आदरांजली

0
286


मातृमंदिरच्या माजी कार्याध्यक्ष, देवरुख हायस्कूल च्या माजी मुख्याध्यापीका शांताताई नारकर यांचे तिव्र हृद्य विकाराने दुःखद निधन झाले. गेली वर्षभर त्या त्यांचा भाचा रानडे यांचेकडे पुणे येथे होत्या.
शांताताई ह्या शालेय जीवनात मावशींच्या सहवासात आल्या आणि मावशींसोबतच राहिल्या मावशींची मानलेली मुलगी म्हणूनच त्यांना ओळखत. मावशींच्या या संस्काराचा आदर्श जीवनभर त्यांनी जपला.
शांताताई ह्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या त्यांची शिक्षक म्हणून शैक्षणिक कारकीर्द आदर्शवत होती, देवरुख सारख्या नामवंत शाळेच्या त्या मुख्याध्यापीका म्हणून त्यांनी आदर्शवत कार्य केले.
अत्यंत सेवाभावी, समर्पणाच्या भावनेने त्यांनी आयुष्यभर काम केले. मातृमंदिर या सामाजिक संस्थेचे शिल्पकार कै विजय नारकर यांच्या सोबत त्यांनी मातृमंदिरच्या उभारणीत आणि विकासात फार मोठे योगदान दिले आहे.

स्ञी शिक्षणासाठी काम करण्याची त्यांची विशेष धडपड होती. मुख्याध्यापक आणि मातृमंदिरच्या संचालक असतांना त्यांनी अनेक मुलींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यांची रहाण्याची जेवणाची सोय केली अनेकांना आर्थिक मदत केली. विशेषतःदहावी नापास मुलींसाठी मनाली हा अनौपचारीक प्रकल्प सुरु चालवीला.
महिलांना उद्योग रोजगारांची संधी मिळावी यासाठी त्यांनी मातृमंदिर महिला गृह उद्योग संस्थेची स्थापना केली मावशी यांनी याला मोठे आर्थिक सहाय्य करत यांत अनेक महिलांना सामावून घेतले. कष्टकरी महिलांच्या प्रश्नावर काम करत त्यांची कष्टकरी महिला संघटना उभारली.
मातृमंदिर मार्फत महिला बचत गट उभारण्यात त्यांचे मोठे योगदान होते ३५० बचतगट आणि बचतगटाचा महासंघ आणि त्या सोबत जोडलेल्या शेकडो महिलांना रोजगाराच्या संधी हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
नारकरभाऊ यांच्या निधनानंतर आम्ही आग्रहपुर्वक कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आणि त्यांनीही ती अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली. त्यांच्या या कालावधीत त्यांनी माजी खासदार हुसेन दलवाई, बबन डिसोजा या सारख्या राष्ट्रीय पातळीवरील सन्माननिय व्यक्तींना विश्वस्तपदावर घेऊन संस्थेचा विस्तार अधिक व्यापक केला.
शांताताई यांचे गोकुळ या मुलींच्या अनाथालयातील गेल्या २५-३० वर्षातील योगदान शब्दातीत आहे. या मुलींप्रती त्यांच्या मनातील मायेचा पाझर विलक्षण प्रवाही होता. जणू आपल्या तारुण्यात अकाली हरपलेल्या सुनिल ची निरागसताच त्या या मुलींच्यात शोधत रहायच्या. त्यांच्या इतरवेळी कठोर शिस्तप्रिय चेहर्यामागील प्रेम आणि वात्सल्यांची अनुभूती गोकुळ परिसरांत यायची. गोकुळच्या मुलींना मावशींनंतर प्रेमळ सहवास त्यांचाच होता आज शांताताईंच्या जाण्याने एक पोरखेपणाची पोकळी निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर महिला म्हणून त्यांचा नावलौकीक होता. त्यांचा लोकसंपर्क विलक्षण मोठा होता. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अनेक सन्मानानी घेतली गेली त्यांना कै.रामविलास लाहोटी स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार,गुरुवर्य अ.आ,देसाई ट्रस्टचा पुरस्कार,महाराष्र्ट शासनाचा पुण्यश्लोक अहिल्या होळकर पुरस्कार,मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते.
नारकरबाई ह्या उत्तम साहित्यिक होत्या इंदिराबाई (मावशी) यांच्या जीवनावरव त्यांनी ‘ हे चंदनाचे खोड’ हे अप्रतीम लेखांचे पुस्तक लिहीले, अन्यही त्यांची पुस्तके आहेत नारकर भाऊंवरील ‘ कातळावरचा तपस्वी ‘ हे संपादन ही अप्रतिम आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीतील अत्यंत अग्रणी कार्यक्षम असणारे महिला नेतृत्व अशा नारकरबाई यांच्या जाण्याने मातृमंदिर परिवार आणि जिल्ह्यांच्या महिला सक्षमीकरण चळवळीचे अपरिमित नुकसान झाले. नारकर बाईंच्या सामाजिक धडपड आणि संवेदनशील सृजनतेचा आदर्श नव्या पिढीसमोर एक दिपस्तंभासम राहील.
अभिजित हेगशेटये
कार्याध्यक्ष
मातृमंदिर
मातृमंदिर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धाजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here