खेडमध्ये अखेर शासकिय कोव्हिड केअर सेंटर सुरु

0
45

खेड : खेड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने लवेल येथील बंद करण्यात आलेले शासकिय कोव्हिड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात १८७ अॅक्टिव्ह रुग्ण असून यापैकी २१ नगरपालिका कोव्हिड केअर सेंटर, ५० कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, १० घरडा कोव्हिड केअर सेंटर तर बाकीच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती खेडचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ राजन शेळके यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. वाऱ्याच्या वेगाने
पसरणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच चालले असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा तरी कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे.गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले होते त्यामुळे लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या इमारतीत शासकिय कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे कोव्हिड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. फेब्रूवारी महिन्यापर्यंत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तितकासा नव्हता. त्यामुळे या कोव्हिड केअर सेंटरची आवश्यकता भासली नव्हती. मात्र ९ फेब्रुवारी २०२१ पासून तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाबाधितांना उपचारांसाठी दाखल करताना आरोग्य विभागासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते.
खेड नगरपालिकेने ठराव करून येथील सुतिका गृहात सुरु केलेल्या कोव्हिड केअर सेंटरची क्षमता २१ खाटांची आहे तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरची क्षमता ५० खाटांची आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या १८७ वर पोहचली असल्याने लवेल येथील कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र तालुका प्रशासनाकडून लवेल येथील कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. लवेल येथील कोव्हिड केअर
सेंटर सुरू करण्याची मागणी वाढू लागल्यानंतर खेडचे आमदार योगेश कदम यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याच्या सुचना केल्या होत्या. माध्यमांनीही याबाबत आवाज उठवला सुरवात केल्यानंतर प्रशासनाने सोमवार दिनांक १२ एप्रिल पासून लवेल येथील कोव्हिड केअर सेंटर अखेर सुरु केले आहे.
लवेल येथील कोव्हिड केअर सेंटर सुरु झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी दाखल करणे सोपे होणार आहे. या कोव्हिड केअर सेंटरची क्षमता ३० खाटांची असून सद्यस्थितीत या कोव्हिड केअर सेंटर मध्ये १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने आणि तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ राजन शेळके यांनी सोमवारी या कोव्हिड केअर सेंटर ला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावेत तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात अशा सुचना अधिकाऱ्यांनी संबधित कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here