पश्चिम बंगाल, केरळ निवडणुकीत गैर भाजपा, गैर काँग्रेसी पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची शरद पवारांची तयारी सुरू
पश्चिम बंगाल, केरळ निवडणुकीत काँग्रेस वगळून साऱ्या विरोधकांना एकाच मंचावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे.महत्वाचे म्हणजे ही तयारी दुसरे तिसरे कोणी करत नसून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारच करत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरद पवारांनी कालच याचे संकेत दिले आहेत. गैर भाजपा, गैर काँग्रेसी पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची तयारी पवारांनी सुरु केल्याचे दिसत असल्याने काँग्रेस आता विरोधकांमधूनही बाजुला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवारांनी मंगळवारी सांगितले की, देशात आताच्या घडीला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत चर्चा सुरु आहे. सीताराम येच्युरी यांनीदेखील याला पाठिंबा दिल्याचे पवारांनी सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेनेने आधीच विरोधकांची मोट बांधण्याचा प्रस्ताव पवारांसमोर ठेवला आहे. आता या आघाडीमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी केरळचे सीपीएमचे महासचिव सीताराम येच्युरी यांनीदेखील रुची दाखविल्याने काँग्रेससमोर अस्तित्वाचे मोठे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. तिसऱ्या आघाडीबाबत अद्याप रुपरेषा ठरली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com