‘हापूस अ‍ॅट युवर होम’साठी रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ करणार मदत- बाळ माने

रत्नागिरी-
‘हापूस अ‍ॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत रत्नागिरीतून आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ प्रयत्न करणार आहे. महापालिकांमध्ये राहणार्‍या 3 कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचला पाहिजे याकरिता संघाचे प्रयत्न आहेत. याला आंबा बागायतदारांचाही प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांनी दिली
कॅनिंगसाठी आंबा विकताना तो 50 रुपये प्रति किलो या हमीभावाने विकावा. कॅनिंग फॅक्टरी प्रतिनिधींनी शेतकर्‍यांचे नुकसान न करता हा हमीभाव दिला पाहिजे, याकरिता तालुका खरेदी विक्री संघ समन्वय साधणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या दुसरी मासिक बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले.
श्री. माने यांनी सांगितले, थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रीकरिता शेतकर्‍यांना गतवर्षीप्रमाणे मदत करण्याचे धोरण तालुका खरेदी-विक्री संघाने आखले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या महापालिकांमध्ये सुमारे तीन कोटी जनता राहते. त्यांना थेट घरापर्यंत आंबा पोहोचला पाहिजे. गतवर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता व अनेक शेतकर्‍यांना फायदा मिळाला होता. यंदासुद्धा कोरोनाच्या संकट काळात हेच करावे लागणार आहे.
सध्या कोकणात बदलत्या हवामानामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पीक विम्याचा लाभ झाला आहे का, या सर्व प्रक्रियेवर तालुका खरेदी विक्री संघ लक्ष ठेवणार आहे. पीक विमा योजनेचे निकष, आंबा, काजू लागवड, भौगोलिक सलगता व हवामान बदल यानुसार विम्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. याकरिता तालुका खरेदी विक्री संघ शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकर्‍यांवर अन्याय होत असेल तर त्यांनी खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले.
केंद्र सरकार पुरस्कृत भात खरेदी योजनेनुसार शेतकर्‍यापर्यंत माहिती पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी अधिकचे उत्पादन घेऊन ते हमी भावाने विक्री केल्यास शेतकर्‍याला हातभार लागेल. याकरिता जनजागृती करण्याचे काम तालुका खरेदी विक्री संघ करत आहे. यासाठी तालुका दौरा सुरू आहे. सोमेश्वर, खेडशी, दांडेआडोम, चांदेराई, नाणीज, हातखंबा, करबुडे, शिरगाव येथे 15 मार्चपर्यंत बैठका घेण्यात येणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button