पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी रत्नतरूणी योजना राबविण्यात येणार-जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने

0
50

पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी रत्नतरूणी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून महिला गाईड तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बचत गटांना कार्यरत असलेल्या १५० महिलांना चारचाकी गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून या महिलांना पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृतीची माहिती दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना चारचाकी चालविण्याच्या प्रशिक्षणासह गाईडचे प्रशिक्षण देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून वीस लाख रुपये निधीची तरतूदही केली गेली. गाईडसंदर्भातील प्रशिक्षण एका खाजगी संस्थेमार्फत दिले जाणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. त्यात अनेक महिलांचे ग्रुपही असतात.
गणपतीपुळे, मार्लेश्‍वर, दापोलीची चंडिका देवी, राजापूरची गंगा यासारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळेच पर्यटकांना माहिती असतात. परंतु प्रत्येक तालुक्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, तिथे पर्यटक गेलेले नाहीत. त्याची माहिती जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांना करून देणे, तिथे नेऊन माहिती देणे यासाठी तज्ञ गाईडची आवश्यकता आहे.
केरळ, गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देतानाच प्रशिक्षित गाईड बनविण्यात येणार आहे. या दुहेरी भूमिका महिला सहजपणे पार पाडू शकतील. तसेच महिलांना रोजगारही मिळू शकेल. जिल्ह्यात गाईडच नसल्यामुळे पर्यटकांना माहिती देणे शक्य होत नाही. ती उणीव जिल्हा परिषदेच्या रत्नतरूणी योजनेतून भरून काढली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षण घेणार्‍या महिलेला परिपूर्ण माहिती दिली जाईल. प्रशिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेटही त्या महिलांना दिले जाणार आहे. अनेक पर्यटक कुटुंबे, महिलांना आकर्षित करून घेण्यासाठीचा हा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात अंमलात आणला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० महिलांना गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. पर्यटनातून महिलांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी याचा निश्‍चितच फायदा होणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here