कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी या २०३ कि. मी.च्या टप्प्यात गुरुवारी इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी यशस्वी

0
40

कोकणचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्यामुळे लवकरच कोकणचा प्रवास हायटेक आणि प्रदुषणमुक्त होणार आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यानच्या २०३ किलोमीटर रेल्वेमार्गावर गुरूवारी वीजेच्या इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. रोहा ते करंजाडी आणि दिवाण खवटी ते रात्नागिरी या रेल्वे मार्गावर ही इंजिन चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे लवकरच आता या मार्गावर डिझेल ऐवजी वीजेवरील इंजिनाच्या सहाय्याने मेल-एक्सप्रेस धावणे शक्य होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विद्युतीकरणानंतरची ही पहिलीच ट्रायल रन यशस्वी झाली आहे. या चाचणीमुळे आता लवकरच कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून ग्रीन सिग्‍नल मिळाल्यावर रोहा- रत्नागिरीदरम्यान रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विजेवर धावू शकणार आहेत.
गुरुवारी सकाळी रोहा येथे अधिकारी, अभियंते यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक इंजिन खेड, चिपळूण असा प्रवास करीत रत्नागिरीत यशस्वीपणे दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी येथून इलेक्ट्रिक इंजिन पुन्हा रोह्याच्या दिशेने नेण्यात आले.
२३ फेब्रुवारीपासून या वीज प्रवाहाची तपासणी करण्यात आल्यानंतर गुरूवारी पहिल्यांदाच वीजेवर धावणारे इंजिन या मार्गावर चालवून रोहा ते रत्नागिरी अशी चाचणी घेण्यात आली. दर नव्वद किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रीकचे सब स्टेशन उभारण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here