मंत्री उदय सामंत मला सेनेत बोलवून स्वतः भाजपमध्ये उडी मारणार?सामंत यांनी आहे तिथेच नांदावे ,ग्रामीण भागात संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य-माजी आमदार बाळ माने यांचे सामंत यांना प्रत्युत्तर
२०१४मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सामंतांना उमेदवारी नाकारली असल्याचाही गौप्यस्फोट
मंत्री उदय सामंत यांना पक्ष बदलण्याची सवय आहे. परंतु मला लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ, भाजपचे बाळकडू मिळाल्याने आमच्या निष्ठा बदलू शकत नाहीत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून भाजपमध्ये उडी मारण्याची संधी सामंत यांना असावी, म्हणूनच ते मला शिवसेनेत बोलवत आहेत, असे प्रत्युत्तर माजी आमदार, बाळ माने यांनी दिले. परंतु सामंत यांनी ‘आहात त्या घरात सुखाने नांदा, तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात, असला पोरकटपणा करू नये, असा टोलाही माजी जिल्हाध्यक्ष माने यांनी लगावला.
गोळपमधील प्रचारसभेत सामंत यांनी बाळ माने यांच्यासंदर्भात वक्तव्य केले. माने यांनी शिवसेनेत यावे, असे आवाहन केले. ग्रामपंचायतीच्या प्रचारात असल्यामुळे आज माने यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ग्रामपंचायत निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक बाळ माने यांच्यासोबत जातील, अशी भीती वाटल्यामुळे संभ्रम निर्माण करण्याकरिता सामंत यांनी वरील विधान करून एक केविलवाणा प्रयत्न केल्याचे माने म्हणाले.
रत्नागिरीच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये विद्यमान आमदार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल मूळ व प्रामाणिक निष्ठांवत शिवसैनिकांमध्ये अन्याय होत असल्याची भावना असल्याने त्याचा उद्रेक होत आहे. तालुक्यातील ६०ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातील काही गावात बिनविरोध निवड झाली आहे. काही गावपॅनेलमध्ये भाजप पुरस्कृतही सदस्य निवडून आले आहेत. १९ तारखेनंतर आम्ही आमचे सदस्य किती आहेत ते सांगून प्रत्युत्तर देऊ, असेही माने यांनी ठामपणे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचा विजय होणार आहे. आगामी पं. स. जि. प आणि लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीची ही नांदी आहे. माने व सामंत काय आहेत याची लोकांना कल्पना आहे.
श्री. माने यांनी सांगितले, सामंत यांनी असे वक्तव्य करून एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सामंत यांना पक्ष बदलण्याची सवय आहे. कारण २०१४ मध्ये विधानसभेसाठी मी युतीकडून अर्ज भरला होता. पराभवाची चाहूल लागल्याने सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एबी फॉर्म घेतला, पण राष्ट्रवादीशी दगाफटका करून ते भाजपच्या गोटात आले होते. परंतु त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सामंत यांना सांगितले, आम्ही निष्ठावंतांना उमेदवारी देतो, असे सांगितले. त्यामुळे बाळ माने निष्ठावंत असल्याने त्यांना ही संधी असून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. तुम्ही पक्षात येणार असलात तर स्वागत आहे. परंतु तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे सामंत यांनी मातोश्रीचा दरवाजा ठोठावला आणि युती तुटल्याने शिवसेनेला उमेदवार हवाच होता. एखाद्या नाटकात कलावंत पेहराव बदलतो तसा भगवा पेहराव केला आणि सामंत सेनेत गेले हा इतिहास लोकांना माहिती आहे.
माने पुढे म्हणाले की, २०१९मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरिता त्यांच्या आदेशामुळे डोक्यावर, काळजावर दगड ठेवून युतीचे उमेदवार म्हणून आयुष्यात प्रथमच सामंत यांचा प्रचार केला, हे सर्वांना ज्ञात आहे. गेली २० वर्षे आम्ही युतीमध्ये काम करत होतो. सामंत राष्ट्रवादीत असल्याने सातत्याने युतीसोबत संघर्ष होत होता. मी मारामार्या केल्या नाहीत, हे सामंत निखालस खोटं बोलतात. राष्ट्रवादीने ज्या ज्या वेळी भाजप, कार्यकर्त्यावर अन्याय केला त्यावेळी मारामारीच काय अन्य काही करायला तयार असतो. हातखंब्यात डॉ. सुजय लेले मारहाण झाल्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही मारामारीसुद्धा केली, असे सांगून आजही कार्यकर्त्यांसाठी तत्पर असल्याचे सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून सामंत यांना दोन वेळा जनतेने निवडून दिले. युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार या स्वप्नासाठी शिवसैनिकांनी २०१४ मध्ये सामंत नवीन असूनही सैनिकांनी निवडून दिले, परंतु ग्रामीण भागात सामंत यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ते दिसून आल्याचे माने यांनी सांगितले.
उदय सामंत यांना मी यापूर्वी कसलाही सल्ला दिला नाही. २०१९ च्या निवडणुकीत फक्त दोन महिने भाजप वरिष्ठांनी सांगितल्यामुळे विजयासाठी काही सल्ला, सूचना दिल्या असतील. सामंत यांचे सल्लागार हे शरद पवार, विनायक राऊत आहेत. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सल्लागार नाही. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. भाजपचा झेंडा आयुष्यभर खांद्यावर ठेवणार आहे. तो खाली ठेवणार नाही, हे तमाम रत्नागिरीकर व महाराष्ट्राला माहिती आहे, असे माने यांनी ठामपणे सांगितले.
www.konkantoday.com