नवे वर्ष, नवा ध्यास…

पाहता पाहता २०२० वर्ष संपले. सर्वांचे लक्ष नवीन वर्षाच्या स्वागताकडे लागले आहे. परंतु अनेकांचे आयुष्य २०२० या वर्षातील चांगले-वाईट प्रसंग, घटना किंवा अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहतील अशाही गोष्टीनी भरलेले आहे. सोशल मिडीयावर तर गेली कित्येक दिवस नवीन वर्षाच्या शुभेछ्या देणारे मेसेज फिरत आहेत. सोशल मिडीयामध्ये यंदाच्या वर्षी व्हॉटस अॅपने वेगळीच उंची गाठली आहे. आपण एखादा सुंदर मेसेज तयार करावा आणि त्याच्या खाली स्वत:चे नाव टाईप करून तो सर्वाना पाठवावा. थोड्या वेळातच आपले नाव बाजूला करून त्या खाली भलत्याच व्यक्तीचे नाव टाईप करून तोच मेसेज पुन्हा आपल्यालाच परत पाठवला जातो. असे अनेक किस्से सर्वत्र पहावयास मिळत आहेत.

आपल्यापैकी अनेक व्यक्तींची येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कोणता नवा संकल्प करायचा याची चाचपणी करून देखील झाली आहे. काही मंडळी घरातील नवीन दिनदर्शिका खरेदी करीत असतील तर काही मंडळी नवीन वर्षातील नवीन लेखाजोखा लिहून ठेवण्यासाठी नवी कोरी डायरी घेण्यात व्यस्त असतील. याच काळात आपल्या लक्षात येते की, बरेच नवे संकल्प करण्यास सुरुवात होते. परंतु त्या संकल्पांचे पुढच्या वर्षामध्ये कितपत यशस्वीपणे पार पाडले जातात. अशी उदाहरणे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपत समाजात पहावयास मिळतात.

नवीन वर्ष आले की, सरत्या वर्षाला निरोप देण्याची धावपळ सुरु होते. नवीन वर्षाचे स्वागत कशा पद्धतीने करायचे त्याच बरोबर या वर्षात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत का? याची जणू एक उजळणीच सुरु असते. त्याच बरोबर हे वर्ष किती लवकर संपले कळलेच नाही? असे प्रश्नार्थक वाक्य बऱ्याच व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडताना दिसते.

२०२० सालीसुद्धा ३६५ दिवस आणि प्रत्येक दिवसामध्ये सुद्धा २४ तास होते. प्रत्येक तासामध्ये ६० मिनिटे होती आणि प्रत्येक मिनिटामध्ये ६० सेकंद होते, हे कोणी लक्षात ठेवत नाही. समोर उभा असलेल्या नवीन वर्षातसुद्धा आपणाला तेवढाच वेळ, दिवस, तास, मिनिटे आणि सेकंद मिळणार आहेत. परंतु नवीन वर्ष म्हटले की, उस्तुकता कशामुळे निर्माण होते. त्याची नक्की काय कारणे वेगवेगळी असतील? याची नोंद केली, तर लक्षात येईल की, “हार ने का डर और जितने की उम्मीद” यामधील जी तणावाची वेळ ही मानवाच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. तसाच काही काळ हा येणाऱ्या नवीन वर्षात आणि सरत्या वर्षात राहिलेल्या काही तासामध्ये असतो. जो व्यक्ती स्वत:च्या मनाचा विचार करून निर्णय घेतो, तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतो.

२०२१ सालामध्ये सर्वांनी एक संकल्प जरूर करावा आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. रात्री झोपताना नेहमी उद्याच्या दिवसाचे नियोजन करा. कारण दररोज केलेली थोडीथोडी प्रगती ही माणसाला यशाच्या अति उच्च शिखरावर घेऊन जाणारी असते. एखादे शिखर गाठायचे असेल तर काही पावले उचलावी लागतील. एखादे दूरचे अंतर पार करायचे असेल तर आतापासूनच चालणे सुरु करायला हवे. प्रत्येक दिवस हा आपल्याला एक चांगला आणि एक वाईट अनुभव देत असतो. “चांगल्या अनुभवातून ऊर्जा घेऊन, वाईट अनुभवाची सोबतीने प्रत्येक संकटावर मात करायची असते.” अशी दुर्गम इच्छा शक्ती उराशी बाळगून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे. हे नवीन वर्ष आपणास सुख, समृद्धी, आनंदायी, आरोग्यसंपन्न व भरभराटीचे जावो. तसेच आपणास जे जे हवे ते ते सर्वकाही मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हे नवीन वर्ष आपल्यातील सर्व सुप्त गुण आणि कौशल्य आजमावण्यासाठी आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या….

  • श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
  • मो. ९०२८७१३८२०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button