जगबुडी नदीवरील दुसऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु,पावसाळ्यापुर्वी पुल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर स्खडलेल्या दुसऱ्या पुलाचे काम सुरु करण्यात आले असून हे काम मे अखेर पुर्ण करण्याचा निर्धार कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीने केला आहे. युद्धपातळीवर काम करून पावसाळ्यापुर्वी नवा पुल वाहतुकीस खुला केला जाईल अशी माहिती पुल उभारणीचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाने दिली.
मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर असलेला ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने या नदीवर नवा पुल उभारण्याची मागणी केली जात होती. परंतू आवश्यक त्या निधीची उपलब्धता नसल्याने नव्या पुलाच्या कामाला मंजूरी मिळाली नव्हती. दरम्यान २० मार्च २०१३ रोजी जगबुडी नदीवरील जुन्या पुलाचा कठडा तोडून महाकाली ट्रव्हल्स या कंपनीचे खासगी आरामबस नदीपात्रात कोसळली. या अपघातात ३७ जणांचा जागीच बळी गेला तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले.
या दुर्घटनेनंतर तत्कालीन शिवसेना खासदार अनंत गीते यांनी जगबुडी नदीवर नवा पुल उभरण्यासाठी लोकसभेत जोरदार मागणी केली आणि जगबुडीच्या नव्या पुलासाठी ८ कोटी रुपयांच्या निधीला गंजूरी मिळाली. निधीची उपलब्धता होताच १० एप्रिल २०१५ रोजी एम बी घारपुरे इंजिनिअर्स अॅन्ड कॉन्ट्रैक्टर या कंपनीने पुलाच्य कामाचा नारळ फोडला. मात्र ठरलेल्या मुदतीत काम पुर्ण न करताच तो ठेकेदार काम,अर्धवट टाकून निघून गेला.
त्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये हे काम महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने पुलाचे अर्धवट राहिलेले काम काही महिन्यातच पुर्ण केले आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी जगबुडी नदीवरील नवा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता या नदीवर असलेल्या दुसऱ्या पुलाचे कामही सुरु करण्यात आले असून हे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
या नव्या पुलाची लांबी १५० मीटर असून उंची १५ मीटर इतकी आहे. तीन गाळे असलेला हा पुल पाऊस सुरु होण्याआधी पुर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी माहिती पुल उभारणीचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाने दिली.
www.konkantoday.com