नाणार प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय , सर्वपक्षीय सभेत प्रकल्पाला पाठिंबा
भौतिक विकासाच्या बाबतीत मागास राहिलेल्या राजापूर तालुक्याचा सर्वांगिण विकास साधावयाचा असेल आणि मंदीच्या दृष्टचक्रात अडकलेल्या राजापूर बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जावू न देणे ही एक संवेदनशिल नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी घेऊन काम करूया असा निर्धार रविवारी येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.तर या प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय असून तो तालुक्याच्या भवितव्याला हानिकारक आहे हे सत्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्प समर्थनार्थ भव्य मोर्चा काढून प्रकल्प समर्थनार्थ एल्गार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
राजापूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ आणि राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मातोश्री सभागृहात ही सर्वपक्षीय बैठक पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर, सचिव अविनाश महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगराध्यक्ष अँड. जमिर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, ज्येष्ठ व्यापारी मजिद पन्हळेकर, शिवसेनेचे राजा काजवे, भाजपाचे वसंत पाटील, व्यापारी संघाचे दिनानाथ कोळवणकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com