अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गुरुवारी (ता.17) मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 2 लाख 47 हजार 500 आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे 1 लाख 70 हजार विद्यार्थी असून उर्वरित 72 हजार 500 विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे सामंत म्हणाले.
www.konkantoday.com