आरोग्यसेवा उपसंचालक जिल्ह्यात एकदाही न फिरकल्याने सर्वत्र संतापः समविचारी मंचने केली मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची महामारी भयंकर वाढलेली असतांना ज्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा रुग्णालय सह ग्रामीण रुग्णालयांचा कारभार चालतो ते उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात एकदाही न फिरकल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब ध्यानी येताच येथील समविचारी मंच या जागृत संघटनेच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे.
समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,युवा अध्यक्ष निलेश आखाडे,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,सोशल मिडीया प्रमुख सुप्रिया भारस्वाडकर,राज्य समन्वयक राधिका जोगळेकर आदींनी जिल्हाधिका-यां मार्फत सादर केलेल्या या निवेदनात,जिल्ह्यात आरोग्य सेवेत अपुरी कर्मचारी संख्या आहे.तरीही उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सेवा सुरू आहे.उपसंचालक हे जबाबदारीचे पद आहे.या पदावरील व्यक्तीने या संकटात सुरु असलेल्या आरोग्य सेवेची पहाणी करणे गरजेचे होते.जिल्ह्यातील कोणत्याही कोव्हिड रुग्णालयाला या संचालकांनी भेट दिल्याचे ऐकीवात नाही.रिक्तपदे असताना डळमळीत झालेल्या आरोग्य सेवेची दखल घेतली नाही.असे नमुद केले आहे.
या विषयी समविचारीच्या पदाधिका-यांनी आपला संताप तीव्र शब्दांत व्यक्त करताना या संचालकांनी जबाबदारी शुन्य वर्तनाचा कळस केला असल्याचे विशद करुन याला निष्काळजीपणा म्हणावे की अनास्था असा प्रश्न उपस्थित करुन भयाण परिस्थितीचे गांभीर्य विचारात न घेता एकदाही न फिरकलेल्या या अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार ? असा सवाल विचारला आहे.स्थानिक रुग्णांना प्रकृतीतील बदलानुरुप औषधोपचार होत नसल्याने परजिल्ह्यात जावे लागत आहे.परिस्थितीचे भान आणि गांभीर्य नसलेल्या या संचालकांनी कर्तव्यात कसूर केली आहे.त्यांचे हे बेजबाबदार वर्तन दुर्लक्षित न करता केवळ खुलासा घेऊन न थांबता कडक कारवाई करावी अशी मागणी करुन त्यांच्या विषयी जनतेच्या मनात असलेला रोष विचारात घेऊन कारवाई करावी अन्यथा भविष्यातील या अधिकाऱ्याविरोधात होणाऱ्या जनतेच्या रोषाला शासन जबाबदार राहील असा इशारा समविचारीच्या वतीने या निवेदनात देण्यात आला आहे.आरोग्य यंत्रणा ही वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे पोखरली आहे यासह स्थानिक राजकारण या सर्व गोष्टी जनतेसमोर आणण्याची ग्वाही राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी दिली आहे.
www.konkantoday.com