चार दिवसात खेडमध्ये तब्बल ५१ जणांचा अहवाल पॉंझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली
खेड : गेल्या चार दिवसात खासगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील तब्बल ५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे येथील चाकरमानीही आता गणेशोत्सवासाठी गावी येऊ लागले असल्याने आगामी काळात कोरोना बांधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी खेडला गेला असला तरी त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊन सारख्या उपाययोजनांमुळे खेड तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालणे शक्य झाले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसतेआहे.
गेल्या चार दिवसात लोटे परिसरातील दोन खासगी डॉक्टर्स, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक नर्स, भरणे नाका परिसरातील खासगी लॅब टेक्निशियन, तसेच, भडगाव येथील एक ट्रकचालक व त्याची पत्नी यांसह तब्बल ५१ जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुण्गांची संख्या तब्बल ३७५ झाली आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ३७५ रुग्णांपैकी २९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने सद्यस्थितीत तालुक्यात ८० रुग्ण ऑॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल ५१ रुग्ण आढळून येणे ही खेडच्या जनतेसाठी धोक्याची घंटा असल्याने नागरिकांनी खबदारी घेणे गरजेचे झाले आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने आता मुंबई, पुणे येथील चाकरमानी कोकणात येऊ लागले आहेत. खेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार आहेत मात्र येणारे चाकरमानी हे कोरोना हॉटस्पॉटमधून येणार असल्याने कोरोनाचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com