लोकमान्य टिळक पुण्यस्मरणाचे निमित्ताने !

0
515

(थोड्याश्या बदलाने पूर्वीचीच पोस्ट कारण परिस्थिती जैसे थे….. जन्मभूमीची अवस्था आजही तशीच…..आता फक्त बदल एवढाच की प्रसिध्द इव्हेंट मॅनेजर, इव्हेंट संकल्पक आणि इव्हेंट प्रड्यूसर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन ऑनलाईन लोकमान्य टिळक )

अँड. धनंजय जगन्नाथ भावे (९४२२०५२३३०)

नमस्कार नागरिक बंधू-भगिनीनो,

उद्या राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. विविध ठिकाणी लोकमान्यांचे स्मरण होणार तसेच रत्नागिरीमधील त्यांच्या जन्मस्थानीही सर्व सामान्य नागरिक, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी ते कदाचित जिल्हाधिकारी वगैरे अतिमहत्वाच्या व्यक्तिंच्या उपस्थितीमध्येही त्यांचे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होणार. गेली अनेक वर्षे तो कार्यक्रम होतो तसाच होणार. इतक्या वर्षानंतरही पडझडीसह आणि पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झालेले टिळक जन्मस्थान आणखी भग्नतेकडे वाटचाल करणार का ? रत्नागिरीमध्ये येणारी प्रत्येक सामाजिक, राजकीय महत्वाची व्यक्तिचा दौरा लोकमान्यांच्या जन्मस्थानाला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जन्मापासून टिळक आळीमध्ये रहात असल्याचा फायदा असा की त्यानिमित्ताने थोरा-मोठ्या असामींचे बरेचदा दर्शन घडते.

मी स्वत: टिळक जन्मभूमीला लागुनच असलेल्या गृह निर्माण संस्थेमध्ये रहातो. माझे आजपर्यंतचे आयुष्य टिळक आळीमध्येच गेले आहे. लहानपणापासून याच वास्तूमध्ये आम्ही खेळलो, अभ्यासही केला, विविध नेते मंडळी तसेच थोर व्यक्तिमत्वेही पाहिली आहेत. मी बरेचदा याठिकाणी जात असतो. टिळक जन्मभूमी हे राष्ट्रीय पुरुषाचे स्मारक फार पूर्वी बांधकाम खात्याच्या ताब्यात होते. श्री. वाटवे, श्री. महाजन यांचेसारखे अभियंता त्याठिकाणी उपलब्ध क्वॉर्टर्स मध्ये वास्तव्य करून रहात होते. त्या काळात या स्मारकाची दुरुस्ती आणि देखभाल उत्तम प्रकारे होत होती हेही मी पाहिले आहे.

रत्नागिरी येथील टिळक आळीमधील टिळक जन्मभूमी हे राष्ट्रीय पुरुषाचे स्मारक हे आपले शासनाचे पुरातत्व खात्याचे कार्यालयाचे अखत्यारीत येते. त्याचे व्यवस्थापनही याच कार्यालयाकडेच आहे. ज्या राष्ट्रीय पुरुषाची प्रतिकृती आम्ही दिल्ली मध्ये तमाम जनतेसमोर ठेवली त्यांच्या टिळक आळीमधील जन्मभूमी या स्मारकाची सध्या अवस्था अत्यंत दयनीय आहे हे आपल्या निदर्शनास आणून देणचा हा अल्पसा प्रयत्न आहे. उद्या कदाचित जन्मस्थानी आपल्याला बऱ्यापैकी स्वच्छता दिसेलही पण ती वस्तुस्थिती नव्हे.

लोकमान्य टिळक जन्मस्थान हे जसे राष्ट्रीय पुरुषाचे स्मारक आहे केवळ यामुळेच अवघ्या देशातील पर्यटक, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तेथे कायम भेट देत असतात. पण या स्मारकाची स्थिती सध्या आणि बरेचदा अशी असते की, टिळक जन्मभूमीच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. उत्तम माडांची बाग, आंब्याची आणि इतर झाडे यांनी नटलेला हा सुमारे एक एकर क्षेत्राचा परिसर कोणत्याही साफ-सफाई विना अत्यंत कचरामय, पडीक, गचाळ आणि अस्वच्छ झालेला आहे. वर्षानुवर्षे या परिसराची साफ सफाई होत नाही.

उदंड पाणी असलेली विहिर असूनही वेळोवेळी नादुरुस्त पंपा अभावी पाण्याचे दुर्भिक्ष. पाण्याच्या साठवणीची सुयोग्य व्यवस्था नाही त्यामुळे पर्यटकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कूलर बसविण्यात आलेला आहे तो गेली कित्येक वर्षे बंद आहे. एक तर तो दुरुस्त केला जात नाही आणि केलाच तर त्याला पुरवठा करण्यासाठी विहिरीचे पाणी मिळेल याचा भरोसा नाही. हा कूलर तर एका देणगीदाराच्या देणगीतून बसविण्यात आलेला होता.

पर्यटकांसाठी उत्तम स्वच्छतागृह बांधलेली आहेत. स्वच्छतागृहाच्या वरील साठवणूक टाकीमध्ये पाणी पुरविणारी पाईप लाईन नादुरुस्त असते त्यामुळे पाण्याअभावी आणि स्वच्छता व फालतु दुरुस्तीअभावी बरेचदा आणि विशेषत: पर्यटन कालावधीमध्ये उपयोगास अयोग्य ! काही काळापूर्वी स्मारकाचे दर्शनी भागातील एका प्राचीन वास्तुचे नूतनीकरण करण्यात आले. दर्शनी भागातील वास्तू गेले सुमारे वर्षभर नव्हे आजही रिकामी आणि बहुधा अपूर्णावस्थेत पडून आहे. टिळक जन्मस्थानाची माहिती सांगण्यासाठी याठिकाणी व्यवस्था नाही.

या जागेमध्ये एक दोन वास्तु वापराअभावी गेले वर्षभर रिकाम्या पडून आहेत, बागेला बाग का म्हणावे अशी अवस्था असते. तेथे नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नाही हा तर कळीचा मुद्दा आहे. एकच माळी तोही थिबा पॅलेसची व्यवस्था पहाण्यात दंग. स्वच्छतेला माणूस नाहीच. कधीतरी येथील पुरातत्व खात्याचा अधिकारी नुसतीच पहाणी करून जातो, काहीतरी फालतू सूचना करून जातो हेही मी पाहिले आहे. सुधारणांविषयी काहीतरी विचारले तर आता सर्व स्मारकाच्याच दुरुस्तीचा प्रस्ताव आम्ही पाठवतो आहोत असे XX बनविणारे उत्तर देतो आणि निघून जातो. लोकप्रतिनिधीना स्मारकाची काय पडलीय असाच सध्या प्रकार आहे.  स्मारकापेक्षा लोकमान्यांचे विचार आम्ही सर्वदूर पोहोचविण्याचे काम करणार असे उत्तर त्यांनी दिले तर त्याला प्रत्युत्तर आहेच. अशी विविध स्मारकांवर खर्च होत आहेच ना?

सारांश एव्हढया मोठया देशभक्ताच्या जन्मस्थानाची ही व्यवस्था आपणा सर्व रत्नागिरीकरांना अभिमानास्पद वाटेल अशी आहे का ? तर नक्कीच नाही. मग यावर उपाय काय असा प्रश्न पडतो.

थोडासा विचार करा, रत्नागिरीमधीलच स्वातंत्र्यवीर सावरकरांची ओळख समजले जाणारे पतितपावन मंदिर संस्था ही विविध संकल्पनांचा स्वीकार करून स्वातंत्र्यवीर सावरकरांची महत्ता जपत असते. संस्थाना आर्थिक मर्यादा असतात हे लक्षात घेता पतितपावन मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास जपलेला आहे याचे कौतुक करावेच लागेल. पण पुरातत्व खात्याला संस्थेसारखी आर्थिक समस्या नाही कारण टिळक जन्मभूमी संपूर्णपणे शासनाच्याच ताब्यात आहे.

जीर्णतेकडे वाटचाल करणारे लोकमान्यांचे जन्मस्थानाची मूळ रचना, गाभा/ढाचा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जन्मस्थानाची चांगली पुनर्बांधणी करणे आता अत्यावश्यक झाले आहे असे वाटते.

स्मारकाचे दर्शनी वास्तू गेले सुमारे वर्षभर रिकामी आणि बहुधा अपूर्णावस्थेत पडून आहे. लोकमान्यांची आणि देशभक्तांची मुलांसाठी असलेली छोटी छोटी चरित्रे किवा त्यांची पुस्तके तेथे विकत घेता येतील अशी व्यवस्था तेथे करता येईल.

मागील जागेमध्ये दोन कर्मचारी निवासस्थाने अर्धवट स्थितीमध्ये संपूर्ण रिकामी पडून आहेत. त्याचा वापर करून लोकमान्य ज्या खगोलशास्त्राचे अभ्यासक होते त्याविषयीचे एकादे छोटेसे तारांगण तयार केल्यास पर्यटक, शालेय विद्यार्थी यांना ते एक अभ्यासाचे केंद्रही होऊ शकेल.

प्रतिवर्षी लोकमान्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व पत्रकार येथे येत असतात. त्यांनीही जन्मस्थानाच्या परिस्थितीची माहिती घ्यावी पुरातत्व खात्याला आपल्या सूचना द्याव्यात असे सुचवावेसे वाटते.

इतके वर्षे जे झाले ते झाले. आता आजूबाजूच्या नागरिकांकडून प्रत्यक्ष परिस्थितीची सर्वंकष माहिती सर्वांनीच घ्यावी आणि लवकरात लवकर लोकमान्य टिळक जन्मभूमी हे ऐतिहासिक स्थान उत्तम आणि आदर्श प्रकारे जतन होण्यासाठी संबंधित पुरातत्व खाते, जिल्हा पालक मंत्री, खासदार, मा. जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक आणि नगर परिषद आणि आपण सर्व नागरिक बंधू-भगिनी यांनी आपापला खारीचा वाटा उचलून आणि सामुहिक प्रयत्न करून ते साध्य करता येईल असे वाटते. उद्याच्या लोकमान्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तज्ञांची एकादी समिती                        मा. जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने नेमण्याचा संकल्प करून याचा शुभारंभ करता येणे सहज शक्य आहे. पण त्यासाठीही केवळ इव्हेंट मॅनेजर किवा इव्हेंट संकल्पक यांची समिती नेमण्यापेक्षा स्मारकाच्या सुशोभिकरणाच्या दृष्टीने काहीतरी ठोस घडवू शकेल अशा सक्षम अधिकारी आणि कार्यकर्त्यांची समिती नेमली गेली आणि काही ठोस उद्दिष्टाने त्या समितीने काम केले तर त्याचा नक्कीच उपयोग होईल.

या वर्षी तर अहो भाग्यम ! आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींसह अनेक थोर मोठे या वर्षीच्या ऑनलाईन इव्हेंटमध्ये सामील होणार आहेत. मूळात आमच्याकडे इव्हेंट मॅनेजर कमी नाहीत आणि इव्हेंटच्याच निमित्ताने उगवणाऱ्य़ा कावळ्याच्या छत्र्याही कमी नाहीत आणि इव्हेंट साजरे करणारेही कमी नाहीत. पण गेल्या वर्ष्भरात यापैकी कोणीही टिळक जन्मभूमीकडे कोणीही ढुंकुनही बघितले नाही हे रत्नागिरीकरांचे दुर्देव. आता त्या निमित्त्ताने कोटीच्या कोटी उड्डाणे वाचली आहेत. मी म्हणतो कोटी जाऊ देत काही लाख खर्च करून त्या स्मारकाची प्राथमिक दुरुस्ती तरी करा, राष्ट्रीय पुरुषाच्या स्मारकाल किमान प्रेझेंटेबल करा एवढीच मनोमन विनंती.

आपल्या सध्याच्या राष्ट्राभिमानी आणि देशप्रेमी शासनाकडून आपण एवढी अपेक्षा नक्कीच करू शकतो !

ॲड. धनंजय जगन्नाथ भावे (९४२२०५२३३०)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here