प्रसिद्धीपासून अलिप्त असलेले रत्नागिरी नगर परिषदेचे खरोखरचे कोरोना योद्धे
आज कोरोनाविरूद्ध संपूर्ण जग लढत आहे. राज्यात व जिल्ह्यातही अनेक वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वॉर्डबॉय, आशा वर्कर्सपासून पोलिसांपर्यंत कोरोना योद्धे म्हणून काम करीत आहेत. मात्र रत्नागिरी नगरपरिषदेच्या कर्मचार्यांची टीम खरोखरच कोरोना योद्ध्यांची महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. रत्नागिरी शासकीय रूग्णालय कोरोना रूग्णालय झाल्यानंतर या रूग्णालयात कोरोना रूग्णांचे मृत्यू झाले. याबाबत प्रशासनाने कोरोना रूग्णांचा याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. कोरोना रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील कुटुंबाला लांबूनच दर्शन दिले जाते. त्यानंतर अंत्यसंस्काराची पुढील जबाबदारी नगरपरिषदेच्या या पथकाकडे सोपविली जाते. यासाठी नगरपरिषदेने कोरोना योद्ध्यांची एक टीम बनवली आहे.
आरोग्य निरीक्षक आरिफ शेख, संदेश कांबळे, किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम कांबळे, दिनेश जाधव, मनोहर कदम, संजय मकवाना, प्रभाकर कांबळे, ज्ञानेश कदम, योगेश मकवाना, योगेंद्र जाधव, विशाल राठोड, बबन बेटकर, संदीप सावंत अशांची दोन पथके बनविण्यात आली आहेत. आणि या पथकांवर कोरोनामुळे मृत झालेल्यांचे अंत्यसंस्काराचे काम सोपविले आहे. आज या कोरोनाच्या परिस्थितीत हे कोरोना योद्धे मोठ्या हिंमतीने काम करीत आहेत. शासकीय कोरोना रूग्णालयातून कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानंतर हे कर्मचारी सज्ज होतात. या पथकातील कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी पीपीई कीट धारण करतात. त्यानंतर रूग्णालयातून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरुन मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. त्यानंतर धर्माप्रमाणे कुणाचे दफन तर कुणाचे दहन केले जाते. त्यानंतर पीपीई कीटदेखील त्याठिकाणी जाळून टाकले जाते. आज या कोरोना योद्ध्यांनी जात, धर्म न बघता अनेक कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्काराचे काम पार पाडले आहे. अंत्यसंस्काराचे कार्य पार पडल्यानंतर घरी जाण्यापूर्वी हे कर्मचारी काळजी घेवून निर्जंतुकीकरण करतात. त्यानंतरच आपल्या घरात जातात. आज हे काम करताना धोका पत्करला असला तरी कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी ही मंडळी काळजी घेत आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी देखील या कोरोना पथकाची दखल घेवून या सर्व कर्मचार्यांचे प्रत्येकी वैयक्तीक २५ लाखांची विमा पॉलिसी नगरपरिषदेच्यावतीने काढून दिली आहे. त्यामुळे हे जोखमीचे काम करत असताना या योद्ध्यांच्या कुटुंबियांची देखील सुरक्षितता जपण्यात आली आहे.
www.konkantoday.com