कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊनच चाकरमान्यांना आणणार -ना. उदय सामंत
गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण आहे. कोकणातील अनेकजण कामानिमित्त मुंबईत असल्याने उत्सवासाठी त्यांना कोकणात आणताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता स्थानिक प्रशासन घेईल, तर सर्वांना मुंबईतून पास देण्याचा प्रयत्न केला जाणार असून टोल माफ केला जाणार आहे. तर नियमावलीबाबत राज्यस्तरावर चर्चा सुरू असून मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या समवेतील बैठकीत त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि बकरी ईद सणानिमित्त समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात सण साजरे करीत असताना प्रशासनाकडून जारी करण्यात येणार्या कलम १४४ च्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सण साजरे केले जातील, असा निर्णय घेण्यात आला. शासन व मंदिरातील प्रमुख यांच्यामध्ये समन्वय साधता यावा यासाठी जिल्हास्तरावर पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रमजान ईद ज्याप्रमाणे साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे बकरी ईद साजरी करीत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या अटी व शर्तीना अधीन राहून प्रशासनाला सहकार्य केले जाईल, आश्वासन संबंधितांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com