मास्टर्स इन सायन्समध्ये रत्नागिरीच्या स्वानंद जोशी याचे सुयश
रत्नागिरी ःरत्नागिरी शहरातील बंदररोड येथील स्वानंद विनायक जोशी याने मास्टर्स इन सायन्समध्ये (फार्मसी) सुयश प्राप्त केले. हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून तो उत्तम गुणवत्तेसह औषधी रसायनशास्त्र शाखेतून उत्तीर्ण झाला. पुढे चार वर्षांच्या कालावधीत पी. एचडी करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
स्वानंदला 9.64 पॉईंटर मिळाले. याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. स्वानंद हा येथील पटवर्धन हायस्कूलचा 2012 चा माजी विद्यार्थी. नंतर त्याने पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा येथे 4 वर्षे कालावधीचा बी. फार्मचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर जी-पॅट ही अतिशय कठीण समजली जाणारी परीक्षा दिली. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशनची परीक्षा दिली व त्यातून निवड झाली. याच्या औषधी रसायनशास्त्र एका ब्रँचला देशभरातील फक्त 30 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
फार्मास्युटिकल सायन्स अँड मॅनेजमेंटमधील उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात अग्रगण्य जागतिक संस्था म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन संस्थेची ख्याती आहे. या संस्थेत शिक्षणासाठी मला संधी मिळाली ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे स्वानंदने सांगितले. हा दोन वर्षांच्या कालावधीतील हा अभ्यासक्रम करताना काटेकोर अभ्यास, शिस्त आली. आई-वडिल व नातेवाइकांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळू शकले. कोरोना विषाणू महामारीच्या कालावधीत या औषध निर्माण क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवणे आवश्यक असून रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनीही या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन स्वानंदने केले.