आता बसं झाले लाॅकडाऊन; नियम पाळून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या-आमदार शेखर निकम यांची मागणी; उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार                      

चिपळूण: लाॅकडाऊनची नाटकं आता बस झाली, आता कोरोना घेऊनच जगावं लागणार आहे, कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यांच्यावर चांगले उपचार करण्यावर भर द्यायला हवा. अन्य देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आपण लाॅकडाऊनकडे चाललो आहोत. हे सारं अन्यायकारक आहे, असे सांगत चिपळूण विधानसभा मतदारसंघातील चिपळूण, देवरूख व संगमेश्‍वरमधील व्यावसायिकांना आता काळजी घेऊन, नियम व अटी पाळून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मिशन ब्रेक चेन म्हणत ८ दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला. आता पुन्हा लाॅकडाऊन आठ दिवसांनी वाढविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम बोलत होते. ते म्हणाले की रुग्ण वाढत आहेत, हे खरं आहे. पण पाॅझिटीव्ह मिळालेल्या रुग्णांना चांगले उपचार कसे देता येतील, आरोग्य सुविधा कशा सुधारता येतील, याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. आता चार महिने झाले, लोकांनी जगायचे कसे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जे निर्णय प्रक्रियेत आहेत ,त्यांना मागेपुढे पगार मिळतील, पण सर्वसामान्य माणसाचं दुःख कुणाला कळणार?,  त्यामुळे आपण उद्या सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी याबाबत सविस्तर बोलणार आहोत. नियम व अटी पाळून आता व्यवसाय सुरू करायला परवानगी द्या, अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, भाजी व्यवसाय सुरू राहणार असतील तर बाकी बंद ठेवून काय उपयोग, अशी भूमिकाही आमदार निकम यांनी मांडली आहे. लाॅकडाऊनचा निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील सर्वच व्यावसायिकांना आपले व्यवसाय आता नियम पाळून व काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी शेखर निकम यांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button