कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सुसज्जीकरण केलेल्या तीन वाॅर्डचा लोकार्पण सोहळा पार पडला
चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेने कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सुसज्जीकरण केलेल्या तीन वाॅर्डचा लोकार्पण सोहळा मंगळवारी आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम यांच्या हस्ते उत्साहीपुर्ण वातावरणात झाला. लोकप्रतिनिधिंसह शासकीय अधिकाऱ्यांनी चिपळूण तालुका मुस्लिम समाज संस्थेचे भरभरुन कौतुक केले. तर प्रशासनानेही आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेने प्रशासनाचे आभार मानले. कोरोनाने जगात हाहाकार उडविला असून महाराष्ट्रादेखील कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढतच आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात जितके कोरोनाग्रस्त वाढत आहेत तितकेच बरे होत आहेत, ही बाब दिलासादायक असली तरी भविष्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वोर्ड सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण यांनी याबाबतची परवानगी दिल्यानंतर ही जबाबदारी चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेकडे देण्यात आली. यानंतर या संस्थेने काही दिवसांतच ही जबाबदारी लिलया पेलत १० लाख रुपये खर्च करीत या रुग्णालयातील तीन वोर्ड सुसज्ज केले. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी तसेच चिपळूण तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आ. शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने आगळा वेगळा उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. यामुळे ही अभिनंदनास पात्र आहे, अशा शब्दांत या संस्थेचे कौतुक केले. कोविड काय इतरवेळीदेखील आरोग्य सुविधेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले. तर या कोविडच्या संकटात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीदेखील जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा करीत आहेत. यामुळे या सर्वांचे कौतुक करतो, असे स्पष्ट केले. तर आ. भास्कर जाधव यांनी देखील चिपळूण तालुका मुस्लिम समाजाचे कौतुक केले. तर कामथे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष हंकारे यांना काही प्रश्न उपस्थित करीत डोस दिला. तसेच माजी आमदार रमेश कदम यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत चिपळूण मुस्लिम समाजाला धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष इब्राहिम दलवाई यांनी केले.
www.konkantoday.com