चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा आणि चिपळूण खरेदी-विक्री संघाचे योगदान यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांची खताची मागणी पूर्ण
चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा मागणीप्रमाणे पुरवठा झाला आहे. मागणीच्या ८० टक्के खत उपलब्ध झाले असून उर्वरित साठा येत्या चार-पाच दिवसात पूर्ण होईल. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा आणि चिपळूण खरेदी-विक्री संघाचे योगदान यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांची खताची मागणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या वर्गमित्रांची त्यासाठी त्यांना चांगलीच मदत झाली.
करोनामुळे रेल्वे बंद, हमाल नाहीत, माल भरला तर तो उतरवायचा कसा, या आणि अशा असंख्य अडचणी असतानाच आमदार शेखर निकम यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना खताचा पुरवठा व्हावा, यासाठी आठ दिवस सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.आरसीएफ कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. मर्गज आणि झुआरी कंपनीचे व्यवस्थापक श्री. तेंडुलकर हे दोघे अधिकारी कृषी विद्यापीठातील आपले वर्गमित्र असल्याचे श्री. निकम यांना समजले. त्यांनी या दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. खरेदी-विक्री संघानेही चांगले सहकार्य केले चिपळूण खरेदी-विक्री संघा आणि शिरगाव सोसायटीने रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आपले तीस हमाल पाठवले आणि माल उतरवून घेतला. संगमेश्वर तालुक्यातील सोसायट्यांना खत पुरवण्याचा परवाना नव्हता. मात्र आमदार श्री. निकम यांनी चिपळूण खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून संगमेश्वरलाही खत उपलब्ध करून दिले.
www.konkantoday.com