गणेशोत्सवात कोकण रेल्वेच्या जास्तीत जास्त गाड्या संगमेश्‍वर व सावर्डे स्थानकात थांबवाव्यात -आ. शेखर निकम यांची मागणी

0
174

कोकण रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर व सावर्डे ही स्थानके असून तेथील प्रवाशांची सतत गर्दी असते. संगमेश्‍वर परिसरात १९६ गावे असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन भूमीमुळे तसेच देव मार्लेश्‍वर तसेच इतर पर्यटन स्थळांमुळे या स्थानकाला महत्व आहे. हे मध्यवर्ती ठिकाण असून संगमेश्‍वर तालुका असल्याने या भागातील प्रवाशांना संगमेश्‍वर हे जवळचे स्टेशन आहे. तसेच सावर्डे स्थानकाच्या परिसरात माजी खा. गोविंदराव निकम यांची सह्याद्री शिक्षण संस्था असून या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सावर्डे लगतच डेरवण येथे पर्यटन स्थळ व रूग्णालय आहे. या स्थानकाच्या परिसरात ५० ते ६० गावातील नागरिक, व्यापारी, चाकरमानी रेल्वेने प्रवास करीत असतात. या दोन्ही स्थानकांवर मार्च, एप्रिल, मे व होळी, गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांना प्रवाशांची गर्दी असते. गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण असल्याने मुंबई, पुणे तसेच अनेक ठिकाणांहून कोकणवासी गणेशभक्त सणाला गावी येत असतात. या कालावधीत दोन्ही स्थानकांवर पॅसेंजर व काही लांब पल्ल्याच्या ठराविक थांबा असलेल्या गाड्या थांबतात मात्र प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता या गाड्या अपुर्‍या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या लांब पल्ल्याच्या थांबा असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त अन्य लांब पल्ल्याच्या जास्तीत जास्त गाड्या या दोन्ही स्थानकांवर गणेशोत्सव कालावधीत थांबा दिल्यास प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल. त्यामुळे या संदर्भात आमदार शेखर निकम यांनी कोकण रेल्वेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांना एक पत्र दिले असून संगमेश्‍वर व सावर्डे स्थानकावर लांब पल्ल्याच्या थांबा असलेल्या गाड्यांच्या व्यतिरिक्त इतर लांब पल्ल्याच्या जास्तीत जास्त गाड्या गणपती उत्सवाच्या कालावधीत या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here