मालवाहू “एस.टी” ची विश्वासार्ह सेवा ,लालपरीचं असंही “संजीवन” रुप

राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत ७२  बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरीत) कार्यरत आहेत. म्हणजेच आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध असून जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतांना दिसत आहे. विश्वासार्हता आणि सुरक्षितता या दोन प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे एस.टी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे. २१ मे पासून आतापर्यंत मालवाहतूक एस.टीने ५४३ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली आहे. त्यासाठी ९० हजार कि.मीचा प्रवास या वाहनांनी केला असून त्यापोटी महामंडळाला २१ लाखांचे उत्पन्न देखील मिळाले आहे.मालवाहतूक बसचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बि-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगाचे डबे, अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एस.टीमधून केली जात आहे. 
एसटी महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. जवळ जवळ प्रत्येक तालुकास्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर ३१ विभागीय कार्यालये, ३३ विभागीय कार्यशाळा असा महामंडळाचा मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे
सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून त्यांच्या मार्फत एम.आय.डी.सी.,कारखानदार, लघुउद्योजक, कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाचे अनेक महामंडळे,व्यापारी आपला माल एसटीच्या मालवाहतुक सेवेतून पाठविण्यास उत्सुक आहेत. पुणे, नाशिक, सातारा, सांगली,जळगांव, गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button