पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन
•सागर देशपांडे,संपादक जडण घडण
पीएल्, पु. ल. आणि भाई…….. जगभरातील मराठी आणि अमराठी लोकांमध्ये रुजलेली पिढ्या न् पिढ्यांची ओळख. 1997 मध्ये पुण्यात आल्यावर काही प्रसंगांच्या निमित्ताने विशेषत: वाढदिवसाच्या निमित्ताने पावलं आपसूकच भांडारकर रस्त्यावरील मालती – माधव इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वळायची. भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला आवर्जून जाणं व्हायचं. सुनीताबाईंनी दिलेल्या वेळेत एरवी त्यांना भेटणे सोयीचे असायचे. पण वाढदिवसाच्या दिवशी जरा अधिक मोकळीक असायची. फोटोंनाही फारशी अडचण यायची नाही. एकदा लवकरच सकाळी नऊच्या सुमारास पुष्पगुच्छ आणि आज-याचे घनसाळ तांदूळ घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचलो. पुलं ची आत्या आजरा तालुक्यातील करपेवाडी इथं होत्या. त्यांच्याकडे ते राहून गेले होते. राजर्षी शाहू महाराज आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक साहेब या दोघांवर भाईंनी लिहिलेल्या अप्रतिम लेखांमध्ये त्याचा उल्लेख आहे. ब-याचदा ते कोवाडला वसंतराव देशपांडे यांच्यासह रणजित देसाई यांच्याकडे यायचे. त्यामुळे घनसाळ तांदळाची चव आणि सुगंध त्यांनी अनुभवला होता. त्या दिवशी त्यांनी हा आनंद आणि त्या आठवणी अगदी मोजक्या वाक्यात बोलून दाखवल्या. शेजारी होते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. त्यामुळे हा फोटो म्हणजे आयुष्यभरासाठी एक अत्यंत अनमोल अशी आठवण आहे. शांताबाई शेळके, चित्तरंजन कोल्हटकर, ज्योत्स्ना भोळे अशी दिग्गज मंडळी भाईंना शुभेच्छा द्यायला आली होती. मराठी भाषा – साहित्य आणि कलांचे ते एक ऐश्वर्यसंपन्न संमेलनच भरले होते. आज भाईंच्या पुण्यतिथीनिमित्ताने अशा भेटींच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या स्मृतीस वंदन.