
चक्रीवादळातील पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचे निर्देश
निसर्ग चक्रीवादळाने दापोली तसेच मंडणगड सह रत्नागिरी जिल्ह्यात इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी अधिकाऱ्यांना दिले याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सोबत ते सोमवारी या दोन तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला मोठ्याप्रमाणावर बसला आहे. सर्वाधिक नुकसान दापोली आणि मंडणगड या दोन्ही तालुक्यात झालेले आहे.
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून दूरध्वनीवर याची संपूर्ण माहिती घेतली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरे तसेच नारळाची झाडे व इतर दापोली आणि मंडणगड तालुक्यात अनेक गावांमध्ये या तीव्र वादळाने विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वांना त्वरित मदत पुरवल्याने सर्वांचे जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करून संबंधितांना नुकसानभरपाई दिली पाहिजे असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
याच अनुषंगाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत पालकमंत्री या भागाचा दौरा सोमवार दिनांक आठ जून रोजी करणार आहेत.
या संयुक्त दौऱ्यात अधिक नुकसान झालेल्या काही गावांची पाहणी ते करणार असून त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एक बैठक देखील ते घेणार आहेत.
www.konksntoday.com