निसर्ग वादळात रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली, मंडणगड भागाला मोठा फटका
नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली या भागाला जास्त फटका बसला. इतर तालुक्यातही काही प्रमाणात अंशतः नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २७ हजार ७८२ घरांचे पूर्णतः व अंशतः नुकसान झाले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. दापोली तालुक्यातील १८ हजार घरांचे, मंडणगड तालुक्यातील ८ हजार घरांचे, खेडमधील ५६७, चिपळूणमधील ३२२, गुहागरमधील १९६, संगमेश्वरमधील १४८, रत्नागिरी ६२९, लांजा ६, राजापूर १४ अशा एकूण २७ हजार घरांची अंशतः पडझड झाली आहे. जिल्ह्यात ५ जण जखमी झाले असून त्यातील ३ जण मिरजोळे येथील तर दोनजण कुंडी येथील आहेत. एकूण जिल्ह्यात ३२०० झाडे पडली. तर ९३० लाईट पोल पडले. जिल्ह्यात एकूण ११ जनावरे या वादळामुळे मृत झाली. याशिवाय अनेक तालुक्यात शासकीय व खाजगी संस्था यांच्या देखील इमारतींना झळ बसली आहे.
मंडणगड, दापोली भागात नुकसान झाल्याने आपण तेथे उद्यापासून दोन दिवसांचा दौरा करीत असून त्या ठिकाणी नुकसानग्रस्तांना लागणारी सर्व मदत आपण शासन एनजीओ यांच्यामार्फत करणार आहोत. सामंत यांनी यावेळी पंचनाम्याचे काम तातडीने सुरू केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतूक केले. पंचनामे झाल्यानंतर ४८ तासाच्या आत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल असेही आश्वासन सामंत यांनी दिले.
www.konkantoday.com