पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने
पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. परवा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. या लुडबुडीच अर्थ काय? असा सवालही या अग्रलेखामधून उपस्थित करण्यात आला आहे.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कोरोनामुळे २०२० हे वर्षच जीवनातून नष्ट झाले आहेइतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तिथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचेल. तेही वाया जाताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याच, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. हा वाद उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाला आहे. मुळात हा वाद नाही. सामंत यांनी आपले मत व्यक्त केलेय.
महाराष्ट्रात विद्यार्थी संख्या १० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून परीक्षा घेणे अवघड होईल. सध्या देशात जशी आरोग्य आणीबाणी आहे तशीच शैक्षणिक आणीबाणीसुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी सरळसोट भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भात त्यांनी यूजीसीला पत्र लिहिले आहे. त्यावरून राजभवनास अंधारात ठेवले, असे राज्यपालांचे मत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ती त्यांची तळमळ आहे. पण तिला व्यावहारिक रूप कसे द्यायचे, असा सवालही सामनामधून राज्यपालांसमोर उपस्थित करण्यात आला आहे.
राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद आहेत. हे चित्र देशभर किंवा जगभर आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत ठाणे, कोकणसह मोठा भाग येतो, तेथील परिस्थिती राजभवनास अवगत नसावी? कोरोनासमोर सगळ्यांनीच हात टेकले. तिथे विद्यापीठे काय करणार? 10 लाख विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर येणार कसे? त्यांची व्यवस्था कशी करायची? कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक पोहोचणार कसे? परीक्षांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण वाढले तर कसे करायचे? अशी विचारणा या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.
सध्या अनेक शैक्षणिक संस्था राज्य सरकारने ताब्यात घेतल्या आहे. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रे कुठे निर्माण करायची? संघप्रणित एबीव्हीपीनेही परीक्षांना विरोध केलाय. गुजरात गोव्यामध्ये भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनांनी आधीच भूमिका जाहीर केली आहे.महाराष्ट्रात भाजपाविरोधी पक्ष सत्तेत आहे, म्हणून विरुद्ध भूमिका घेतली जात आहे का? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.
www.konkantoday.com