क्रयशक्ती जपून ठेवा.

काही दिवसापूर्वी सर्वांचे जीवन अगदी धावत्या मशीनप्रमाणे सुरु होते. या मशीन रुपी जगण्याला कोरोना रुपी विषाणूचा भला मोठा अडथळा लागला आहे. मार्च महिन्याच्या शेवटी-शेवटी केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली. राज्य शासनाने सुद्धा त्याला पाठींबा देत सर्वच ठिकाणचे शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. जनतेला आवाहन केले गेले जिथे आहात तिथेच रहा. घरीच राहण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन सर्वच स्तरावर करण्यात आले. कोरोना आजारावर एकमेव उपाय ‘विलगीकरण’ म्हणजे एकमेकापासून किमान एक मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
असो, परंतु या संचारबंदी पूर्वीच्या काळात मानवाला सतत व्यस्त राहण्याची एक लावलेली सवय त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढलेली क्रयशक्ती खूप गतिमान झाली होती. अचानक संचारबंदी लागू केल्यामुळे घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस अनेक व्यक्तींनी कुटुंबाबरोबर मनसोक्त वेळ घालवत आनंद लुटत आहेत. परंतु या कालावधीमध्ये नवीन काही तरी शिकण्याची संधी मिळाली आहे हे विसरून चालणार नाही.
धावपळीच्या काळात अनेक गोष्टीवर आपण इतरांच्यावर अवलंबून राहतो. (उदा. बाहेरून घरी आल्यावर अनेकदा पाणी द्या, चहा द्या किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आपण सहज करू शकतो आशा गोष्टी करत नाही. काही व्यक्ती मग त्या स्त्री असो वा पुरुष घरात असणाऱ्या व्यक्तींना काही काम नसते असे म्हणत असतात.) आता या संचारबंदीच्या काळात अनेक व्यक्तीची क्रयशक्ती प्रचंड प्रमाणात कमी होत आहे. ही क्रयशक्ती जपून ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा ही संचारबंदी उठेल तेव्हा पूर्वीसारखे आपणाला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्थरावर तंदरुस्त असणे आवश्यक आहे.
मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार असे सांगितले जाते की, ‘सलग एकवीस दिवस ज्या क्रिया केल्या जातात, त्याची मानवाच्या शरीराला सवय लागते आणि अशी सवय ही हळूहळू व्यसनात रुपांतरीत होते.’ एखादी सवय सोडणे सोपे आहे, परंतु लागलेले व्यसन सोडणे फार कठीण आहे. भविष्यात आळशीपणा, निवांतशीरपणा, निरूत्साहीपणा, घरी राहणेची सवय किंवा कामात होणारी चालढकल ही मानवाच्या भविष्याला घातक ठरते हे नक्की. यावर एक सुंदर उदाहरण द्यावेसे वाटते.
एकदा संपूर्ण जगामध्ये वाढलेल्या दृष्टचक्राला कंटाळेलेले वरूणराजा (पाऊस) सर्वांना शाप देतात की, ‘पुढील एक तप (बारा वर्षे) पाऊस पडणार नाही.’ त्यांची ही आकाशवाणी सर्वजण ऐकून खूप निराश होतात. नैराश्याचे प्रमाण वाढते. अनेक शेतकरी शेतात जाण्याचे सोडून देतात. पाऊस पडणार नसेल तर शेतात जाऊन तरी काय उपयोग? असा प्रश्न अनेकांच्या समोर उभा असतो.
एक शेतकरी कंटाळून जंगलात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जातो. जंगलात खूप आतमध्ये गेल्यावर त्याला पहावयास मिळते की, एक मोर त्याच्या लहान पिलांना नृत्य शिकवत असतो. हे नृत्य शिकवत असल्याचे तो शेतकरी पाहतो.
मोर त्याच्या पिल्लांना नृत्य शिकवत असताना त्यातील एक पिल्लू मोराला प्रश्न विचारते, ‘जर पाऊसच पडणार नसेल तर आम्ही हे नृत्य शिकून काय उपयोग?’
त्यावर तो मोर त्याला म्हणातो, “एक लक्षात ठेव वरुणराजाने सांगितले आहे. एक तपानंतर म्हणजे बारा वर्षांनी पाऊस पडणार आहे. कायमचाच पडणार नाही असे नाही.’ तुम्ही जर आता नृत्य करण्याची सवय ठेवली नाही, तर कदाचित तुम्ही ते कायमस्वरूपी विसरून जाल आणि बारा वर्षानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुम्हाला नृत्य करता येणार नाही. म्हणून नियमितपणे नृत्याचा सराव करणे आवश्यक आहे.”
मोर आणि त्याच्या पिलाचे संभाषण शेतकरी ऐकतो. त्या शेतकऱ्यामध्ये आशावादी किरण निर्माण होतो. आत्महत्या करण्याचा विचार सोडून तो लगबगीने घरी परत येतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सोबत घेतो. शेतीतील साहित्य सोबतीला घेऊन शेतात पूर्ण कष्टाने काम करण्यास सुरुवात करतो. काम सुरु करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्याला तोच प्रश्न विचारतात जो मोराच्या पिलाने मोराला विचारलेला होता.
‘पुढील बारा वर्ष पाऊस पडणार नाही तर शेतात काम करून काय उपयोग?’
तेव्हा तो शेतकरी मोर आणि त्याचे पिलू यांच्यातील संवाद सांगतो. त्याचे कुटुंबीयसुद्धा सकारात्मक ऊर्जेने काम करण्यास सुरुवात करतात. शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे कष्ट पाहून वरुणराजाचे मन भरून येते आणि पाऊस पडतो. त्यापुढे सर्व गोष्टी हळूहळू पहिल्यासारख्या होण्यास सुरुवात होते.
नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या जवळ काय आहे किंवा नाही? यापेक्षा आपल्या जवळ असणारी क्रयशक्ती शाबूत/सुरक्षित ठेवली पाहिजे. उत्तम भविष्य घडविण्यासाठी स्वत:मध्ये क्रयशक्ती असणे फार महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा.

  • मंगेश विठ्ठल कोळी.
  • मो. ९०२८७१३८२०
  • ईमेल mangeshvkoli@gmail.com
    (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button