कोरोनाच्या लढाईत मानसिक स्वास्थ्य जपणं आवश्यक


कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे गेले ५-६ महिने जगभरात आणि भारतात महिन्याभरापासून एक अघोषित युद्ध सुरू आहे.खरं म्हणजे हा एक प्रकारचा नैसर्गिक प्रकोपच म्हणावा लागेल. वा प्रकोपापुढे गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जात-पात-धर्म-प्रांत-स्थळ-काळ कशाचंही बंधन नाही. कुणीही, कधीही आणि कुठेही याला बळी पडू शकतो.यासाठीच प्रशासनाने औषधोपचाराबरोचर लॉकडाऊन, सोशल डिस्टसिंग इ. बंधनं आपल्यावर लादली आहेत. महाराष्ट्राचा विचार करता फक्त १ महिना आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. परंतु वर्षानुवर्षे आपल्या घरात अडकून पडल्यासारखी साऱ्यांची
अवस्था झालीय. तरी एक बरंय की नोकरदार माणसं ‘वर्क फ्रॉम होम’ करताहेत.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तसेच लॉकडाऊनचेही फायदे-तोटे आहेत. आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. हा सर्वात मोठा तोटा, परंतु याचे फायदेही बरेच जाणवले असं म्हणायला हरकत नाही. घरातल्या मुलांना आईबाबा काही तासंच दिसत होते. आज २४ तास डोळ्यांसमोर आहेत. काहीतरी संवाद घडतोय, आईबाबांनाही आपल्या लहानग्या बाळांचं कोडकौतुक पहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. माझ्या दृष्टीने ही सर्वांत मोठी संधी निसर्गाने आपणाला दिलीय,
नाहीतर घड्याळाबरोबर धावताना मुलं कधी मोठी होतात, कळतंच नाही. नात्यांची ही वीण गुंफलीच जात नाही, धकाधकीच्या या
जीवनात घरात सर्व सुखसोयी असूनही किंवा गरीबाला आपली झोपडीसुद्धा राजमहालाप्रमाणे वाटत असते, परंतु केवळ
झोपण्यासाठीच आपण घरात येतो का? असा प्रश्न पडावा इतके तास आपण घराबाहेर आपापल्या कामानिमित्त असतो. त्यामुळे
आता घरात काय करावं, असा प्रश्न पडणं साहजिक आहे, परंतु प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार काहीना काही कामात स्वतःला
गुंतवून घेतले पाहिजे.


वाचकहो, कोणत्याही बिकट परिस्थितीत आपल्या शारीरिक स्वास्थाबरोबरच मानसिक, स्वास्थ जपणं फार गरजेचं असतं.
यासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरातून काही कॉलनीमध्ये ऑर्केस्ट्रासारखे संगीतमय कार्यक्रम, मनोरंजनाचे काही वैयक्तिक कार्यक्रम
सर्व नियम पाळून गेले जात आहेत. मा, पोलीस अधिक्षक श्री. प्रविण मुंडेजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बॅण्ड पथकाचा कार्यक्रम
एका कॉलनीत तसेच रस्त्यावरही करण्यात आला, खरोखरच संगीत ही मनाला उभारी देणारी सर्वोत्तम ऊर्जा आहे. आजच्या या
संकटसमयी अशा ऊर्जेची नितांत गरज आहे. डॉ. प्रविण मुंडे आणि त्यांचे पोलीस पथक यांना यासाठी धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच!
आपण आपल्या घरात सतत भयावह बातम्या ऐकण्या-बघण्याऐवजी अधूनमधून मनोरंजनात्मक हलके-फुलके कार्यक्रम बघणं
आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. किंवा आपल्या कॉलनीत वरीलप्रमाणे काही कार्यक्रम नियम पाळून करावेत.
आपल्या कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमेल ती मदत करावी.
गेली २० वर्षेमी समुपदेशनाचं काम करतेय, या लॉकडाऊनच्या काळात ज्या घरांमध्ये काही कौटुंबिक वाद, मुलांचे काही प्रश्न किंवा व्यसनाधीन व्यक्तींची समस्या पूर्वीपासून सुरू होत्या. त्यांच्यासाठी हा काळ अगदी जीवावर बेतण्यासारखा झालाय. अशा व्यक्तींचे मला सतत फोन येताहेत. परंतु सगळी पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था या कोरोनाग्रस्तांच्या पुनर्वसनात व्यस्त असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येत नाहीये. अशावेळी मी त्यांना फोनवरूनच मार्गदर्शन, समुपदेशन करीत आहे.जेणेकरुन त्यांचं कुटुंब, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये.जोपर्यंत लॉकडाऊन उठवलं जात नाही, तोपर्यंत अशा कोणत्याही समस्येसाठी आपण आमच्याशी फोनवरून संपर्क साधू
शकता. ही सेवा मोफत व संपूर्ण दिवसासाठी सुरू आहे. वाचकहो, आपला संयम, सहनशीलता व देशप्रेमापोटी ही ‘कोरोना जंग’आपण अर्धा जिंकलीय. यापुढेही प्रशासन, पोलीस व डॉक्टर्स मंडळींना सहकार्य करून संपूर्ण देश संकटमुक्त करूयात. ‘स्वयंसेतू’ ही आमची संस्थाही आपल्या मदतीला तत्पर आहे. कोणत्याही मदतीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधूशकता.


श्रद्धा कळंबटे
९४२२४३०३६२
संस्थापक, स्वयंसेतू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button