औद्योगिक आस्थापना बंदीचे आदेश

रत्नागिरी दि. २१ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात असणाऱ्या सर्व छोटया मोठया उद्योगांच्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत. शासनाने कोरोना‍ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. सदर कायदा रत्नागिरी जिल्हयासाठी लागू करण्यात येत असून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील छोटे मोठे उद्योग कारखाने इत्यादी येथे काम करणाऱ्या कामगारांना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये व त्यांना प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या मार्फत तो इतरांकडे पसरु नये म्हणून अशा सर्व आस्थापना बंद करणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्हयातील छोटे मोठे उद्योग, कारखाने इत्यादी या आदेशान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याबाबत आदेशीत केले आहे. सदर आदेश अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक कायद्यानुसार अभिप्रेत असणाऱ्या वस्तु तयार करणाऱ्या, सेवा देणाऱ्या आस्थापना तसेच वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असणारी साधने, उपकरणे, औषधे इ. तयार करणाऱ्या आस्थापना यांना लागू होणार नाही. तथापि अशा आस्थापना यांनी त्यांचे कामगारांना किंवा त्यांचे मार्फत अन्य इसमांना कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही याबाबत सर्व प्रकारच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांना आपली आस्थापना चालु ठेवणे आवश्यक वाटत असेल अशा आस्थापनांनी त्यांच्या कारणमिंमासेसह जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे त्याबद्दलचा वेगळा प्रस्ताव लेखी स्वरुपात सादर करावा.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व कलम 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71 , 141 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button