चाफळकर बंधूंच्या रत्नागिरी येथील नवीन सिटीप्राईडच्या मल्टीप्लेक्स थिएटरच्या निमित्ताने…

0
67

थिएटर आणि आम्ही तसे सख्खे शेजारी. टिळक आळीमध्ये बरोबर राधाकृष्ण चित्रमंदिरच्या मागे लागूनच खेरांच्या वाड्यात मी अनेक वर्षे रहात होतो. राधाकृष्ण आणि लता ही दोन माझ्या आठवणीतील थिएटर्स. मोठे अपत्य राधाकृष्ण आणि छोटे लता टॉकीज.  सन १९६१ मध्ये माझी मुंज राधाकृष्ण  मध्ये झाली तेव्हा राधाकृष्ण प्रथम पाहिले असावे. अर्थात तोपर्यंत कोणी आजोबा-काकांनी सिनेमाला नेले असले तर आठवत नाही.
नंतर थोडे कळायला लागल्यानंतर पूर्वीपासून आमच्याकडे येणारे मॅनेजर राजाभाऊ कुलकर्णी अगदी जवळचे कौटुंबिक मित्र. आमच्याकडे दिवसातून किमान ३- ४ वेळा तरी येऊन आजी-आजोबांजवळ गप्पा मारून जाणारे. सर्व व्यवस्था वितरक म्हणून चाफ़ळकर बंधू यांचेकडेच होती हे मला आठवतं. आमचे घर मालक आणि चाफळकर यांचेही जवळचे संबंध. (कदाचित राधाकृष्णची जागा खेरांची असावी-मला नक्की आठवत नाही. ) राधाकृष्णसमोर पांढरी त्याकाळातीलअम्बॅसिडर लागलेली असली की ओळखायचे आता ती गाडी असे पर्यंत राजाभाऊ आपल्याकडे फिरकणार नाहीत, मालक आलेले आहेत. स्वच्छ पांढरा झब्बा, धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी आणि काळी टोपी रुबाबदार, करारी चेहऱ्याचे व्यक्तिमत्व म्हणजे चाफळकर वितरकांचे सर्वेसर्वा बापूसाहेब आणि अप्पासाहेब याना पहाण्याचा योगही मला लहान वयात येत असे. राजाभाऊंचे पालक म्हणून चाफळकर साहेब आमच्या आजोबांना भेटायला कधीतरी येत असत. चित्रपट वितरण ही त्याकाळातील केवढी मोठी सर्कस होती मला चांगलच आठवत. रीळांचे डबे मिळवणे, त्यांची कोकणात एस टी बसने उन्हाळा पावसाळा यांचेशी टक्कर देत ने आण करणे, ती वेळच्या वेळी ठराविक चित्रपट गृहामध्ये पोहोच होतील याची व्यवस्था बघणे ही केवढी तरी मॅनेजमेंट चाफळकर बंधू यांचे प्रभावी आणि प्रमुख़ मार्गदर्शनाखाली कशी होत असे याचे आश्चर्य वाटते. मला वाटत पश्चिम महाराष्ट्रामध्ये  ते मोठे चित्रपट वितरक होते.
बापूसाहेब आणि अप्पासाहेब यांच्या सारख्या मराठी व्यक्तिंच्या मोठया छायेखाली चाफळकर बंधूनी चित्रपट वितरणाचे कार्य अनेक वर्षे अविरतपणे चालू ठेवले आहे हे विशेष आहे.

आजही आता त्यांची पुढील पिढी यामध्ये कार्यरत आहे याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. राधाकृष्ण थिएटरच्या नूतनीकरणानंतर आता आज सिद्धिविनायक नगरमध्ये सिटीप्राईड मल्टीप्लेक्सचा शुभारंभ होत आहे.

रत्नागिरीच्या नागरिकांना मेट्रो सिटीप्रमाणे एकाच छताखाली व्हॅलेनटाईन डे च्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आवडीचा सिनेमा पहाण्याचा एक चांगला ऑप्शन चाफळकर बंधू उपलब्ध करून देत आहेत याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. या नवीन उपलब्धतेचा रत्नागिरीमधील सर्व आबालवृध्द लाभ चांगल्याप्रकारे घेतील यात शंकाच नाही. रत्नागिरीमध्ये बँकेमध्ये आणि कंपन्यांमध्ये जॉबच्या निमित्ताने दूरवरून येणाऱ्या तरुण वर्गाची करमणुकीची एक अत्यावश्यक गरज आज पूर्ण होत आहे याचाही आनंद होतो. हिंदी सिनेमा बरोबरच विशेषत: तरूण वर्गाला आजही इंग्रजी सिनेमांचे आकर्षण आहे. पण येथील थिएटरमध्ये ती सोय कधीतरीच होत असे आणि आता ती मल्टिप्लेक्समुळे नक्कीच होईल अशी आशा आहे. चाफळकर बंधू ती नक्कीच उपलब्ध करून देतील यात शंकाच नाही. चाफळकर उद्योगसमूहातील उद्योग समूहातील तरुण उद्योजक श्री. सागर हे रत्नागिरीचे म्हणजेच देसाई बंधूंचे जावई आहेत. म्हणून पुन्हा एकदा चाफळकर बंधूंच्या या नवीन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

धनंजय भावे-   ९४२२०५२३३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here