श्रीराम चित्रपटगृहात “धुरळा” चित्रपट प्रेक्षकांनी पाहिला नाकावर हात ठेवून

रत्नागिरी शहरातील श्रीराम नाट्यगृहात “धुरळा” हा चित्रपट प्रदर्शित झाला असून राजकारणावर आधारित असलेल्या या चित्रपटात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक असे नामवंत कलाकार आहेत. हा चित्रपट सायंकाळी ६ वा. श्रीराम चित्रपटगृहात लागला असून काल रविवारी चित्रपट पाहण्यास गेलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट नाकावर हात ठेवून पाहण्याची वेळ आली. चित्रपट पाहण्यासाठी आधीच मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते. त्यातच संपूर्ण चित्रपटगृहात मुतारीच्या वासाचा घमघमाट सुटला होता. त्यामुळे तेेथे बसणे प्रेक्षकांना अवघड होत होते. काही तरूणींचा गट चित्रपट पाहण्यात उत्साहाने आला मात्र आतील घमघमाटाने त्या हैराण झाल्या. असा हा घमघमाट असेल तर आपण मध्यंतरालाच चित्रपटगृहातून निघून जाऊ या अशी त्यांची चर्चा सुरू होती परंतु त्यांचा हा निर्धार फार काळ टिकला नाही. १५ मिनिटातच त्यांनी चित्रपटगृह सोडले. चित्रपट चांगला असल्यामुळे उर्वरित प्रेक्षकांनी नाईलाजाने हा चित्रपट शेवटपर्यंत पाहिला. याबाबत चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना हा प्रकार लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, आतमध्ये वास येतो आहे ना तो येणारच. आमचा सफाई करणारा कामगार आला नाही. त्याला आम्ही काय करणार? आधीच मोबाईल आणि टीव्हीच्या स्पर्धेत चित्रपटगृहाकडे प्रेक्षक फिरकत नाहीत. श्रीराम चित्रपटगृहात अशा प्रकारच्या वासाच्या घमघमटामुळे प्रेक्षकांच्या आरोग्यावरही परिणाम होवू शकतो. याशिवाय स्वच्छतेबाबतही तेथील परिस्थिती पाहण्यासारखीच आहे. आधीच्या प्रेक्षकांनी टाकलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या, वेफर्सच्या पिशव्या तशाच पडून होत्या. त्यातही चित्रपटगृहात असलेले डास प्रेक्षकांना आपले अस्तित्व जाणवून देत होते. चित्रपटगृह साफ करण्याचेही सौजन्य दाखवण्यात आले नव्हते. येणार्‍या प्रेक्षकांनी पैसे मोजूनही अशी परिस्थिती का सहन करावी असा प्रश्‍न उपस्थित होत असून संबंधित प्रकारा बाबत
आरोग्य यंत्रणेकडे तक्रारी करण्यात येणार आहेत. चित्रपटगृहाने निदान ठेवलेल्या नावाला तरी जागून चित्रपटगृहाची शान टिकवावी अशी सामान्य चित्रपटप्रेमींची मागणी आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button