पराभवाने खचून न जाता जिंकायची प्रेरणा जागृत करा- चंद्रकांतदादा पाटील

रत्नागिरीरत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतील पराभवाने मनाला चटका लागला. उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन हे अजातशत्रू आहेत. पण पराभवामुळे कोणीही खचून जाऊ नका, पुन्हा नव्याने कामाला लागा. निवडणुकीत हार-जीत असते. सरकार नसतानाही कामे करता येतात. कार्यकर्त्यांनी असाच उत्साह, जोश दाखवा. जिंकायची प्रेरणा जागृत करा, 2024 ला जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.जयेश मंगल पार्कमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी चंद्रकांतदादांचा सत्कार केला. अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले की, भाजप कमी नाही, हे सिद्ध झाले. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ते फिरत होते. प्रचारात कुठेही कमतरता नव्हती. हा विजय नक्की होता, पण थोडे कमी पडलो. गेल्या 35 वर्षांत मला प्रथमच निवडणूक लढवायला मिळाली, हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण वाटतो. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. दादांनी आज वेळ दिल्याने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. तुम्ही असेच पाठीशी उभे राहिलात तर नक्कीच कमळ फुलवू.

दादा म्हणाले की, 1980 पासून राज्यात कोणत्याही पक्षाला 100 पेक्षा जागा मिळाल्या नाहीत. भाजपने सलग दोन वेळा या जागा मिळवल्या. ‘किंगमेकर’ म्हणणार्‍या राष्ट्रवादीलाही एवढ्या जागा मिळवता आल्या नाहीत. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, तर हे सरकार आपोआप पडणार आहे, असे दादांनी सांगितले. चांगली खाती मिळाली नाही म्हणून तर काही जणांना मंत्रीपदच न मिळाल्याने नाराजी आहे. त्यांची समजूत फार काळ काढता येणार नाही, असा चिमटा दादांनी काढला.

व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, अ‍ॅड. विलास पाटणे, अशोक मयेकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, मुन्नाशेठ सुर्वे, राजश्री शिवलकर, ऐश्‍वर्या जठार, अंजली साळवी, पंचायत समिती सदस्य स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते. सचिन वहाळकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी दामोदर लोकरे, सुजाता साळवी, वैद्य भिडे, डॉ. सुभाष देव, नीलेश आखाडे, संगीता कवितके, माजी नगरसेविका अ‍ॅड. सुमिता भावे आदींनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button