राम मंदिराच्या निकालाने जनमानसात सकारात्मकता, नवचैतन्य – भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी आज मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करूया. प्रभू रामचंद्र भारतीय जनमानसातील श्रद्धास्थान आहे. प्राचीन परंपरा, पौराणिक संदर्भ लाभलेल्या या देशात श्रीरामाचे स्थान श्रद्धेय, वंदनीय, पूजनीय राहिले आहे. अयोध्या हे श्रीरामाचे जन्मस्थान आहे या प्राचीन संदर्भाला न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने अधोरेखित केले, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले. सर्वांनी शांतता व सलाेखा राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की, आजचा निर्णय बहुप्रतिक्षित होता. राम जन्मभूमी संदर्भाने झालेली आंदोलने, लाखो कारसेवकांनी केलेली सक्रिय कारसेवा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा असे अनेक आव्हानात्मक प्रसंग या देशाने अनुभवले. पण आज अयोध्याची जागा रामलल्लाची असल्याचे निकालात स्पष्ट झाले आणि बहुसंख्य जनमानसाच्या अतूट विश्वासाला आजच्या निकालाने सार्थता आली. श्री राम मंदिर निर्माणासाठी केंद्र शासनाने ट्रस्ट निर्माण करून निश्‍चित कालावधीत राम मंदिर निर्माण कार्य सुरू करण्याचे निर्देश महत्त्वपूर्ण आहेत.
केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्री राम मंदिराच्या भव्य निर्माण कार्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाबरहुकुम वेगवान कार्यवाही करेल आणि भारतीय जनमानसाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाचे भव्य मंदिर उभारून समस्त रामभक्तांच्या अपेक्षांची परिपूर्ती होईल. यासाठी आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशात नवचैतन्य पसरले आहे. सर्वत्र जनमानसात उत्सवी लहर पसरली आहे. रामभक्तांच्या कारसेवकांच्या भावना खूप बोलक्या आहेत. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजप रत्नागिरी मनापासून स्वागत करत आहे, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button